Kitchen Garden Tips : महागडा लसूण नको! प्लास्टिकच्या बाटलीत घरच्या घरी उगवा ताजा लसूण

महागडा लसूण विकत घेण्याऐवजी घरच्या घरीच उगवा ताजा लसूण! प्लास्टिकच्या बाटलीत लसूण लावण्याची ही सोपी पद्धत जाणून घ्या आणि काही दिवसांत मिळवा हिरवीगार लसूणपात…
Kitchen Garden Tips : महागडा लसूण नको! प्लास्टिकच्या बाटलीत घरच्या घरी उगवा ताजा लसूण
Kitchen Garden Tips : महागडा लसूण नको! प्लास्टिकच्या बाटलीत घरच्या घरी उगवा ताजा लसूण'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

किचनमध्ये दररोज वापरला जाणारा लसूण दिवसेंदिवस महाग होत चालल्याच्या बातम्या आपल्या कानावर नेहमीच पडतात. अशावेळी लसणाच्या वाढत्या किमतींमुळे स्वयंपाकघराचा बजेट बिघडू लागलं आहे. म्हणूनच घरच्या घरीच लसूण उगवता आला तर? विशेष म्हणजे यासाठी मोठी जागा किंवा शेतीची गरज नाही.अगदी छोट्याशा जागेत, प्लास्टिकच्या बाटलीतही तुम्ही सहज लसूण लावू शकता. कसं ते जाणून घ्या..

घरात पडून असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे डबे किंवा पिशव्यांचा वापर करून लसूण सहज लावता येतो. हा एक सोपा ‘किचन गार्डन’ आयडिया असून, अगदी कमी जागेत ताजं उत्पादन मिळवण्याचा उत्तम पर्याय ठरतो.

लागवडीसाठी लागणारे साहित्य

  • २ किंवा ५ लिटरची रिकामी प्लास्टिकची बाटली

  • सुपीक माती

  • शेणखत किंवा गांडूळ खत

  • लसणाच्या पाकळ्या

  • छिद्र पाडण्यासाठी गरम खिळा

लसूण लावण्याची पद्धत

सर्वप्रथम प्लास्टिकची बाटली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर बाटलीच्या बाजूंना २ ते ३ इंच अंतरावर लहान छिद्रं पाडा. या छिद्रांचा आकार लसणाच्या पाकळ्यांप्रमाणे असावा. बाटलीच्या तळाला पाण्याचा निचरा होण्यासाठी ३ ते ४ मोठी छिद्रं पाडणं आवश्यक आहे.

यानंतर बाटलीत माती आणि खताचं मिश्रण भरून घ्या. माती भरताना प्रत्येक छिद्राजवळ ती व्यवस्थित बसवून घ्या. आता प्रत्येक छिद्रात एक लसणाची पाकळी अशा प्रकारे लावा की टोकदार भाग बाहेरच्या बाजूला राहील आणि मुळाचा भाग मातीत जाईल.

सूर्यप्रकाश आणि पाण्याची काळजी

लावलेली बाटली बाल्कनीत किंवा खिडकीजवळ ठेवा, जिथे दररोज किमान ४ ते ५ तास सूर्यप्रकाश मिळेल. वरून हलक्या हाताने पाणी द्या. माती ओलसर राहील याची काळजी घ्या, मात्र पाणी साचणार नाही याची दक्षता घ्या.

१०-१५ दिवसांत मिळेल लसूणपात

अवघ्या १० ते १५ दिवसांत हिरवीगार लसूणपात दिसू लागते. ही पात चटणी, भाजी किंवा विविध पदार्थांमध्ये वापरता येते. साधारण ४ ते ५ महिन्यांनंतर पाने पिवळी पडू लागली की पूर्ण लसूण तयार झालेला असतो.

घरच्या घरी ताजं उत्पादन

या पद्धतीने तुम्ही अगदी कमी जागेत, कमी खर्चात आणि सहजपणे ताजा लसूण उगवू शकता. किचन गार्डनिंगची आवड असणाऱ्यांसाठी ही एक सोपी आणि उपयोगी पद्धत ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in