

तुम्ही रोज खात असलेली किटकॅट चॉकलेट… पण ती चोरीच्या मालाचा भाग असू शकते, असा विचार कधी मनात आलाय का? आश्चर्य वाटेल, पण युरोपमध्ये तब्बल १२ टन किटकॅट चॉकलेट चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती देत नेस्ले (Nestlé) ने ग्राहकांनाही थेट तपासात सहभागी करून घेतलं असून, यासाठी खास 'स्टोलन किटकॅट ट्रॅकर' सुरू करण्यात आला आहे.
तुमच्याकडील किटकॅट 'त्या' चोरीचा भाग आहे का?
तुमच्याकडे असलेली किटकॅट चोरीची आहे की नाही हे तपासणं अगदी सोपं आहे. किटकॅटच्या पॅकेटच्या मागच्या बाजूला असलेला ८ अंकी बॅच कोड शोधायचा आणि तो 'स्टोलन किटकॅट ट्रॅकर'मध्ये टाकायचा. हा कोड चोरी झालेल्या शिपमेंटशी जुळतो का, याची माहिती काही क्षणांत मिळते. जर तुमच्याकडील चॉकलेट त्या चोरीचा भाग निघाला, तर संबंधित अधिकाऱ्यांना ही माहिती कळवण्याच्या सूचनाही दिल्या जातात.
नेमकं काय चोरीला गेलं?
या घटनेत तब्बल ४ लाखांहून अधिक किटकॅट बार्स चोरीला गेले आहेत. यामधील मोठा हिस्सा 'फॉर्म्युला १' थीमवरील लिमिटेड एडिशन चॉकलेट्सचा होता. किटकॅट आणि एफ१च्या भागीदारीत तयार करण्यात आलेल्या या विशेष चॉकलेट्समुळे ही चोरी चाहत्यांसाठी आणि संग्रह करणाऱ्यांसाठी मोठा धक्का मानली जात आहे.
मार्केटिंग स्टंट की खरोखरची चोरी?
या संपूर्ण प्रकरणावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काहींना हा भन्नाट मार्केटिंग स्टंट वाटत असला, तरी काहीजण याला गंभीर सुरक्षेचा मुद्दा मानत आहेत. किटकॅटच्या सोशल मीडिया टीमने मात्र या प्रकरणाला वेगळ्या पद्धतीने हाताळत लोकांना तपासात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
ग्राहकांसाठी दिलासा
नेस्लेने स्पष्ट केलं आहे की, चोरीला गेलेली सर्व चॉकलेट्स खाण्यास पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि गुणवत्तेशी संबंधित कोणतीही समस्या नाही. तसेच बाजारात किटकॅटची कमतरता भासणार नसल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.
ट्रॅकरमागचा खरा उद्देश
या ट्रॅकरचा उद्देश केवळ प्रचार नसून, चोरीचा माल बाजारात विकणे कठीण करणे हा आहे. बॅच कोड सार्वजनिक केल्यामुळे संशयास्पद चॉकलेट्स ओळखणं सोपं होणार आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाचा धागा मिळण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे, पुढच्या वेळी किटकॅट खाताना पॅकेटवरील बॅच कोड एकदा नक्की तपासा. कदाचित तुमच्या हातातली किटकॅटच या मोठ्या चोरीचा धागा असू शकतो.