दसऱ्यानंतर येणारी आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. वर्षातील प्रत्येक १२ पौर्णिमेला विशेष महत्त्व असले तरी, शरद पौर्णिमा ही धन, आरोग्य आणि समृद्धीसाठी महत्वाची मानली जाते. या दिवशी चंद्राला खास पूजाअर्चा केली जाते. परंपरेनुसार, कोजागरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात तापवलेले दूध ग्रहण करण्याची प्रथा आहे. अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि रात्री जागरण करून देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची पूजा करतात. तसेच, चंद्राची पूजा करण्याची परंपरा देखील पाळली जाते.
हिंदू धर्मानुसार, या दिवशी केलेली पूजा, चंद्रप्रकाशात केलेले उपास आणि साधना आर्थिक समृद्धी, आरोग्य आणि सुख-समाधानासाठी फळदायी मानली जाते.
यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ?
अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा येते. हिंदू पंचांगानुसार, ही पौर्णिमा ६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:२३ वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी ७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०९:१६ वाजता संपेल. त्यामुळे मुख्य सण 6 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
कोजागिरी पौर्णिमा मुहूर्त
कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त ६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:४५ पासून सुरू होऊन ७ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री १२:३४ पर्यंत राहणार आहे. कोजागिरी पूजेसाठी या काळात ४९ मिनिटांचा खास शुभ मुहूर्त असेल, ज्यात पूजा आणि विशेष विधी पार पाडणे फलदायी मानले जाते.
मसाला दूध पिण्याची प्रथा
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवण्याची प्राचीन मान्यता आहे. या दिवशी मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते. मान्यतेनुसार चंद्राच्या प्रकाशात ठेवलेले मसाला दूध प्यायल्याने अनेक औषधी फायदे होतात असे म्हटले जाते.