
कोकणात गणेशोत्सव म्हणजे उत्साह, आनंद आणि परंपरेचा मिलाफ. गणेश चतुर्थीच्या स्वागतापासून ते विसर्जनापर्यंत प्रत्येक दिवस खास मानला जातो. मूर्तीची निवड, सजावट, पाहुणचार आणि प्रसादाची तयारी यामध्येच कोकणी घराघरातल्या बाप्पांचे स्वागत थाटामाटात केले जाते. गावखेड्यात अजूनही सर्व कुटुंबीय आणि शेजारी मिळून घरोघरी आरतीसाठी जाण्याची प्रथा टिकून आहे. आरतीनंतर दिला जाणारा प्रसाद म्हणजे त्या सणाचा अविभाज्य भाग. कोकणातील बहुतांश घरांत आरतीनंतर हमखास दिला जाणारा पौष्टिक आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे ‘पंचखाद्य’ .
पंचखाद्याची खासियत
काजू, सुकं खोबरं, चणा डाळ, शेंगदाणे आणि लाह्या हे पाच मुख्य घटक एकत्र करून हा प्रसाद तयार होतो.
या पदार्थांना गुळाच्या एकतारी पाकाचा गोडवा लाभतो आणि वेलचीचा सुगंध त्यात रुजतो.
नावाप्रमाणेच ‘पंचखाद्य’ हा पंचपदार्थांचा संगम असल्याने तो प्रसाद सांस्कृतिक महत्त्वाबरोबरच आरोग्यदायी मानला जातो.
कामकाजाच्या धावपळीतही सोपा उपाय
आजच्या व्यस्त जीवनशैलीत रोज दहा दिवसांसाठी नवनवीन नेवेद्य तयार करणे प्रत्येक गृहिणीसाठी शक्य नसते. अशा वेळी पटकन होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा हा पारंपरिक गोड पदार्थ मोठा दिलासा ठरतो. त्यामुळे चला तर जाणून घेऊया कसा बनतो हा पदार्थ?
साहित्य
काजू - १ कप
सुकं खोबरं - १ कप
चणा डाळ - १ कप
शेंगदाणे - १ कप
लाह्या - ३ ते ४ कप
गूळ - १ कप
पाणी - गरजेनुसार
वेलची पूड - अर्धा चमचा
कृती
१. सर्वप्रथम कढई गरम करून त्यात काजू, सुकं खोबरं, चणा डाळ आणि शेंगदाणे हे पदार्थ कोरडे भाजून घ्यावेत.
२. एका पातेल्यात गूळ आणि पाणी घालून एकतारी पाक तयार करावा.
३. त्या पाकात भाजलेले सर्व जिन्नस व वेलची पूड मिसळावी.
४. शेवटी त्यात लाह्या घालून सर्व मिश्रण नीट हलवून घ्यावे.
आणि अशा रीतीने गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी तयार होतो कोकणाचा खास पारंपरिक पंचखाद्य!
गणेश भक्तीचा गोड स्पर्श
गणेशोत्सवात पंचखाद्य फक्त प्रसाद म्हणून नाही, तर सहभोजन, एकोप्याची भावना आणि परंपरेचा गोडवा टिकवून ठेवतो. म्हणूनच कोकणातील बाप्पाच्या आरतीनंतरचा हा गोड प्रसाद भक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतो.