

उन्हाळ्यात उकाड्यामुळे भूक कमी होते, पण जेवणात काहीतरी हलकं, चविष्ट आणि ताजेतवाने असावं अशी इच्छा होते. अशा वेळी कोकणातील पारंपरिक कैरीची आंबटगोड कढी जेवणात वेगळीच रंगत आणते. कैरीची आंबट चव, नारळाच्या दुधाची गोडसर चव आणि गुळाचा हलका गोडवा या तिघांचा सुंदर संगम म्हणजे उन्हाळ्यातील परफेक्ट कम्फर्ट फूड.
साहित्य
कैरी - १ मोठी
किसलेला ओला नारळ - २ वाट्या
गूळ - १ मोठा चमचा
मीठ- चवीनुसार
आले
लसूण
हिरवी मिरची
तेल
मोहरी
मेथी दाणे
सुकी लाल मिरची
हिंग
कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम कैरी स्वच्छ धुवून वाफेवर किंवा कुकरमध्ये मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. थंड झाल्यावर तिचा गर काढून बाजूला ठेवा.
मिक्सरमध्ये किसलेला नारळ आणि कैरीचा गर घालून थोडं पाणी टाकत बारीक वाटा. हे मिश्रण गाळून त्याचं गुळगुळीत नारळाचं दूध तयार करा.
या दुधात आले-लसूण-मिरचीची पेस्ट, मीठ आणि गूळ घालून सर्व मिश्रण नीट एकजीव करा.
यानंतर कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, मेथी दाणे आणि सुकी लाल मिरची टाका. फोडणी तयार झाल्यावर त्यात चिमूटभर हिंग घाला.
आता या फोडणीत तयार केलेलं कैरी-नारळाचं मिश्रण ओता आणि मंद आचेवर हलक्या हाताने ढवळत कढी एकजीव होऊ द्या.
शेवटी वरून कोथिंबीर घालून गरमागरम कढी भातासोबत सर्व्ह करा.
खास टिप्स
कढी उकळू देऊ नका, नाहीतर नारळाचं दूध फाटू शकतं.
कैरी खूप आंबट असल्यास गुळाचं प्रमाण थोडं वाढवा.
जास्त घट्टपणा हवा असल्यास नारळाचं दूध कमी पाण्यात तयार करा.
या कढीसोबत आंबेमोहर भात किंवा साधा वाफवलेला भात अप्रतिम लागतो.
उन्हाळ्यातील जेवणाला आंबट-गोड आणि सुगंधी चव देणारी ही कोकणी कढी नक्की करून पाहा.