श्रावण महिना आला की सणांचा उत्साहच वेगळा असतो. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधनानंतर येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी.
हिंदू धर्मात श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला, मध्यरात्री रोहिणी नक्षत्रात भगवान विष्णूच्या आठव्या अवताराचा, श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे दरवर्षी या तिथीला भक्तिभावाने जन्माष्टमी साजरी केली जाते.
कृष्ण जन्माष्टमी २०२५ तारीख आणि तिथी
यंदा अष्टमी तिथीचा प्रारंभ १५ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८:१९ वाजता होईल आणि ती १६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:०४ वाजता संपेल. पंचांगानुसार, श्रीकृष्ण जन्माष्टमीचा मुख्य सण १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.
कृष्ण जन्माष्टमी पूजा मुहूर्त
पूजेचा शुभ मुहूर्त १६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२:०४ ते १२:४७ असा असून, एकूण ४३ मिनिटांचा असेल. यावेळी मध्यरात्रीचा क्षण १२:२६ वाजता तर चंद्रोदय रात्री १०:४६ वाजता होईल.
रोहिणी नक्षत्राची वेळ
रोहिणी नक्षत्राची वेळ यंदा १७ ऑगस्टच्या पहाटे ४:३८ वाजता सुरू होऊन १८ ऑगस्टच्या पहाटे ३:१७ वाजता संपेल. अनेक भक्त अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्राच्या संयोगानुसार उपवास करतात, तर काहीजण तिथी संपल्यानंतर व्रत पार पाडतात.
कृष्ण जन्माष्टमी पूजा विधी
जन्माष्टमीच्या रात्री १२ वाजता श्रीकृष्ण किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालावे. शक्य असल्यास शंखाद्वारेही अभिषेक करू शकता. स्नानानंतर नवीन वस्त्र परिधान करून, चंदनाचा टिळक, सुगंधी द्रव्य, मोरपंख, बासरी आणि तुळशीची पाने यांनी मूर्तीचा शृंगार करावा. त्यानंतर मूर्तीला पाळण्यात ठेऊन पाळणागीते गात झुलवावे. नैवेद्य म्हणून लोणी-साखर, पंजीरी, फळे, मिठाई आणि तुळशीची पाने अर्पण करावीत. पूजा पूर्ण झाल्यावर भगवान श्रीकृष्णाची आरती करून “हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे” या महामंत्राचा जप करावा. उपवास केल्यास, प्रसाद ग्रहण करून व्रत सोडावे.