नवी दिल्ली : कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण येत्या २५ वर्षांत जवळपास ७५ टक्क्यांनी वाढून १.८६ कोटींवर पोहोचतील, असे द लॅन्सेट नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासात म्हटले आहे. देशाच्या आर्थिक वाढीसह ज्येष्ठ नागरिकांची वाढती लोकसंख्या हा प्रमुख घटक असल्याचे संशोधकांनी सांगितले.
२०५० पर्यंत नवीन कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ६१ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३.०५ कोटींवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
१९९० पासून आतापर्यंत कर्करोगामुळे मृत्यूंमध्ये ७४ टक्क्यांनी वाढ होऊन ती संख्या १.०४ कोटींवर पोहोचली आहे, तर नवीन प्रकरणे दुपटीहून अधिक वाढून २०२३ मध्ये १.८५ कोटींवर गेली आहेत. यातील बहुतांश परिणाम हा निम्न व मध्यम उत्पन्न गटातील देशांवर झाला आहे.
भारतात कर्करोगाचे प्रमाण २६ टक्क्याने वाढले
भारतात १९९०-२०२३ दरम्यान कर्करोगाचे प्रमाण २६.४ टक्क्यांनी वाढले असून, हे जगातील सर्वाधिक वाढीपैकी एक आहे, तर चीनमध्ये याच काळात १८.५ टक्क्यांनी घट झाल्याचे आढळले.
जगभरातील कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४० टक्क्यांहून अधिक मृत्यू हे ४४ जोखमीच्या घटकांशी संबंधित आहेत. यात तंबाखूचा वापर, अपुरी आहार पद्धती आणि रक्तातील उच्च साखर यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची संधी उपलब्ध असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले.
याबाबत वेगाने कार्यवाही करण्याची गरज असूनही जागतिक आरोग्य क्षेत्रात कर्करोग नियंत्रण धोरणे व त्यांची अंमलबजावणी यांना प्राधान्य मिळत नाही. अनेक देशांमध्ये या आव्हानाला तोंड देण्यासाठी पुरेसा निधीही उपलब्ध नाही, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक व वॉशिंग्टन विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन येथील डॉ. लिसा फोर्स यांनी सांगितले.
‘ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज’ या अभ्यासात २०४ देशांतील माहितीचा अभ्यास करून आजारांचे स्वरूप, जोखीम घटक व आरोग्य हानी यांचे वेळोवेळी मोजमाप केले जाते.
संशोधकांनी नमूद केले की, १९९० ते २०२३ दरम्यान जागतिक मृत्युदरात २४ टक्क्यांनी घट झाली असली तरी उच्च आणि निम्न उत्पन्न गटातील देशांमध्ये घटण्याचा दर असमान होता.
नवीन प्रकरणांचा दर मात्र कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये (२४ टक्के वाढ) आणि कनिष्ठ मध्यम उत्पन्न गटातील देशांमध्ये (२९ टक्के वाढ) जास्त असल्याने, मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या प्रदेशांमध्ये असमान वाढ दिसून आली आहे.
कर्करोग हा जागतिक आरोग्य भाराचा महत्त्वपूर्ण घटक राहिला आहे आणि आमचा अभ्यास दाखवतो की, येत्या दशकांत त्यात मोठी वाढ होणार आहे. विशेषतः मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या देशांमध्ये ही वाढ अधिक असेल. अचूक आणि वेळेत निदान तसेच दर्जेदार उपचार मिळवून आरोग्य सेवेत असलेले अंतर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. ज्यामुळे जगभरात कर्करोग उपचारांचे समान परिणाम साध्य होऊ शकतील, असे त्या म्हणाल्या.
अंदाजानुसार २०५० मध्ये जगभरात कर्करोगाची ३.०५ कोटी रुग्ण असतील, तर १.८६ कोटी मृत्यू होतील. जे अनुक्रमे २०२४ च्या तुलनेत ६०.७ टक्के व ७४.५ टक्के वाढ दर्शवतात, असे संशोधनात म्हटले आहे.