स्नॅक टाइमला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट तयार होणारे प्रोटीनने भरलेले 'सोया पकोडे'

फक्त काही साहित्य आणि काही मिनिटांत तयार होईल हा हेल्दी, चवदार स्नॅक जो सगळ्यांचा आवडता ठरेल!
स्नॅक टाइमला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट तयार होणारे प्रोटीनने भरलेले 'सोया पकोडे'
स्नॅक टाइमला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट तयार होणारे प्रोटीनने भरलेले 'सोया पकोडे'
Published on

संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी स्वादिष्ट, पण आरोग्यदायी खायचंय? मग हे ‘सोया पकोडे’ तुमच्यासाठीच! प्रोटीनने भरपूर, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे हे पकोडे पार्टीसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा वीकेंड ट्रीटसाठी एकदम परफेक्ट आहेत. फक्त काही साहित्य आणि काही मिनिटांत तयार होईल हा हेल्दी, चवदार स्नॅक जो सगळ्यांचा आवडता ठरेल!

साहित्य:

  • सोया चंक्स (नगेट्स) – 1 कप

  • बेसन (हरभरा पीठ) – 1 कप

  • तांदळाचं पीठ – 2 चमचा

  • कांदा – 1 मध्यम (बारीक चिरलेला)

  • हिरवी मिरची – 2 (बारीक चिरलेल्या)

  • आले-लसूण पेस्ट – 1 चमचा

  • लाल तिखट – 1 चमचा

  • हळद – 1/4 चमचा

  • गरम मसाला – 1/2 चमचा

  • कोथिंबीर – 2 चमचे (बारीक चिरलेली)

  • मीठ – चवीनुसार

  • पाणी – आवश्यकतेनुसार

  • तेल – तळण्यासाठी

कृती :

या स्वादिष्ट सोया पकोड्यांसाठी सर्वप्रथम पाणी उकळवून त्यात सोया चंक्स १० मिनिटे भिजवा. नंतर ते पाणी काढून चंक्स चांगले पिळा. एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचं पीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून घट्ट पिठाचं मिश्रण तयार करा. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. आता त्यात सोया चंक्स टाका आणि सर्व चंक्सवर बेसनाचं कोटिंग बसू द्या.

कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून हे चंक्स सोनेरी रंग येईपर्यंत तळा. तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढा आणि हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा. काही मिनिटांत तयार होणारा हा प्रोटीनयुक्त स्नॅक पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत एकदम परफेक्ट आहे!

हेल्दी ट्विस्ट

  • पकोड्यांच्या मिश्रणात थोडा लिंबाचा रस टाकल्यास चव अधिक चटपटीत लागते.

  • डायट करणाऱ्यांसाठी, हेच पकोडे एअरफ्रायरमध्येही बनवता येतात.

logo
marathi.freepressjournal.in