Ramadan 2026 : ईदसाठी बेस्ट मेहंदी आयडिया; सोप्या डिझाइन्सने वाढवा हातांची सुंदरता

चांद आणि कंदील (लालटेन) या थीमवर आधारित डिझाइन्स ईदसाठी खास मानल्या जातात. अशा प्रकारच्या मेहंदीमुळे हातांना सणासुदीचा आणि उठावदार लूक मिळतो.
Ramadan 2026 : ईदसाठी बेस्ट मेहंदी आयडिया; सोप्या डिझाइन्सने वाढवा हातांची सुंदरता
(Photo-Instagram)
Published on

सौदी अरेबियामध्ये चंद्रदर्शन झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी भारतामध्ये ईद साजरी केली जाते. यंदा सौदी अरेबियात आज २० मार्चला ईद साजरी होत असल्याने भारतात उद्या २१ मार्च रोजी ईद साजरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजची रात्र 'चांद रात' म्हणून साजरी केली जाणार आहे. रमजान महिन्याच्या समाप्तीची ही रात्र असल्याने देशभरात उत्साहाचे वातावरण असून विशेषतः महिलांमध्ये सणाच्या तयारीला सुरुवात झाली आहे.

चांद रात म्हणजे केवळ चंद्रदर्शन नव्हे, तर सणाची खरी सुरुवात मानली जाते. या दिवशी घरोघरी गोडधोड पदार्थांची तयारी केली जाते आणि महिलांचा साज-श्रृंगार करण्याकडे विशेष भर असतो. त्यात मेहंदीला विशेष महत्त्व आहे. ईदच्या निमित्ताने हातांवर सुंदर मेहंदी काढणे ही एक परंपरा असून, यासाठी अनेकजणी आधीच वेगवेगळ्या डिझाइन्सची निवड करत असतात.

सध्या साध्या आणि आकर्षक मेहंदी डिझाइन्सना अधिक पसंती मिळत आहे. चांद आणि कंदील (लालटेन) या थीमवर आधारित डिझाइन्स ईदसाठी खास मानल्या जातात. अशा प्रकारच्या मेहंदीमुळे हातांना सणासुदीचा आणि उठावदार लूक मिळतो. तसेच कमी वेळात सहज काढता येणाऱ्या या डिझाइन्समुळे घरबसल्या देखील सुंदर मेहंदी काढणे शक्य होते.

याशिवाय, मिनिमल स्टाईल मेहंदीही सध्या ट्रेंडमध्ये आहे. छोटे चांद-सितारे, आणि रेखीव डिझाइन्स वापरून तयार केलेली मेहंदी हातांना आकर्षक लूक देते. कटआउट पद्धतीची डिझाइन्सही ईदच्या काळात लोकप्रिय असतात. विशेषतः नवविवाहित महिलांसाठी पूर्ण हातावर (फुल-हँड) मेहंदी काढण्याचा ट्रेंड अजूनही कायम आहे, ज्यामुळे हात अधिक उठून दिसतात.

हाताच्या मध्यभागी अर्ध्या चंद्राची आकृती आणि बोटांवर आकर्षक डिझाइन काढून त्यात आपल्या जोडीदाराचे नाव लिहिण्याचाही ट्रेंड वाढत आहे. अशा मेहंदीमुळे ईदी घेण्याचा क्षण अधिक खास बनतो. एकूणच, चांद रातच्या निमित्ताने मेहंदीच्या या सोप्या आणि ट्रेंडी डिझाइन्समुळे महिलांना कमी वेळात सुंदर आणि आकर्षक लूक मिळू शकतो.

logo
marathi.freepressjournal.in