

घरात स्वयंपाकासाठी LPG सिलिंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १ ऑक्टोबरपासून LPG सिलिंडरची बुकिंग, सबसिडी, डिलिव्हरी आणि कनेक्शनशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचा सिलिंडर बुक करण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
सबसिडीसाठी आधार बायोमेट्रिक आवश्यक
सबसिडीचा घरगुती LPG सिलिंडर घेणाऱ्या ग्राहकांना आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करावे लागू शकते. ज्यांनी अद्याप ही प्रक्रिया केलेली नाही, त्यांना पुढील सबसिडीचा सिलिंडर बुक करण्यापूर्वी ती पूर्ण करावी लागू शकते.
ही प्रक्रिया गॅस एजन्सीत जाऊन करता येते. तसेच डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मदतीने किंवा संबंधित गॅस कंपनीच्या मोबाइल ॲपवरही ही सुविधा उपलब्ध होऊ शकते.
दोन सिलिंडरच्या बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर
घरगुती LPG सिलिंडरच्या दोन रिफिल बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवावे लागणार असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी काही शहरी भागांत हा नियम लागू होता. आता तो देशभरातील घरगुती LPG ग्राहकांसाठी लागू केला जाऊ शकतो.
सिलिंडर घेताना OTP द्यावा लागणार
सिलिंडरची डिलिव्हरी घेताना नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर आलेला OTP सांगणे आवश्यक होऊ शकते. योग्य ग्राहकापर्यंत सिलिंडर पोहोचावा आणि बनावट बुकिंग किंवा चुकीची डिलिव्हरी टाळता यावी, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे गॅस कनेक्शनशी जोडलेला मोबाइल क्रमांक अपडेट असणे महत्त्वाचे ठरणार आहे.
PNG असलेल्या भागांत काय बदल?
ज्या भागांत पाइपद्वारे गॅस जोडणी म्हणजेच PNG उपलब्ध आहे, तेथे LPG कनेक्शनबाबत नियम अधिक कडक होऊ शकतात. अशा भागातील ग्राहकांना PNG कनेक्शन घेण्यास सांगितले जाऊ शकते. नोटीस मिळाल्यानंतर ठरावीक मुदतीत PNG कनेक्शन न घेतल्यास LPG कनेक्शन बंद करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे वृत्तात म्हटले आहे.
१ ऑक्टोबरला LPG सिलिंडरचे दर बदलणार?
तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाचे दर, आयात खर्च आणि कर यासारख्या बाबींवर सिलिंडरचे दर अवलंबून असतात. त्यामुळे १ ऑक्टोबरला घरगुती किंवा व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमती बदलतात का, हे नवे दर जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.