फक्त रंगवण्यासाठीच नाही तर केसांच्या समस्यांवरही मेहंदी आहे उपयोगी; जाणून घ्या फायदे
Freepik

फक्त रंगवण्यासाठीच नाही तर केसांच्या समस्यांवरही मेहंदी आहे उपयोगी; जाणून घ्या फायदे

मेहंदी सामान्यपणे वेगवेगळे सण, उत्सव आणि लग्नसमारंभावेळी हातांचे सौंदर्य खुलवण्यासाठी उपयोग केला जातो. अनेक प्रकारच्या मेहंदी डिजाईन यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय केस पांढरे झाल्यावर केसांना रंगवण्यासाठी मेहंदीचा उपयोग केला जातो. मात्र, याच्या पलिकडे मेहंदी ही केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर देखील खूप उपयुक्त आहे. जाणून घ्या मेहंदीचे केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवरील उपयोग...
Published on

नैसर्गिक कंडिशनर

सामान्यपणे आपण केस मुलायम होण्यासाठी कंडिशनरचा उपयोग करतो. पण तुम्हाला माहित आहे का केसांना कंडिशनर करण्यासाठी मेहंदी ही सर्वोत्तम नैसर्गिक कंडिशनर आहे. तुम्हाला केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनर करायचे असेल तर मेहंदीमध्ये अंडे किंवा दही घालून हे मिश्रण केंसांना अर्धा तास लावून ठेवावे. अर्धा तासाने केस कोमट पाण्याने धुवून टाकावे. केस मुलायम होतील.

केसांमधील कोंडा (Dandruff) कमी करण्यासाठी

केसांमध्ये कोंडा किंवा डँड्रफ असेल तर मेहंदी त्याच्यावर अतिशय उपयुक्त असते. मेहंदी भिजत घालून ती केसांना लावून केस धुतल्यास केसांमधील कोंडा कमी होतो. तसेच नियमित मेहंदीचा प्रयोग केल्याने केसांमध्ये कोंडा निघून जातो.

केसांमधील खाज घालवण्यासाठी मेहंदी उपयुक्त

केसांमध्ये सातत्याने खाज येत असेल तर मेहंदी त्यावर उपयुक्त ठरू शकते. मेहंदीमध्ये अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबियल तत्वे असतात. यामुळे केसांमधील खाज कमी होते.

केसांना मजबूत बनवण्यासाठी

मेहंदीमध्ये टॅनिन हा घटक असतो. जो केसांच्या कॉर्टेक्समध्ये शिरून केसांना मजबूती प्रदान करतो. तसेच यामुळे केस मुलायम आणि चमकदार दिसतात.

कोणती मेहंदी वापरणार?

तसे पाहता हल्ली बाजारात अनेक प्रकारच्या मेहंदी उपलब्ध आहेत. त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या उपयोगितेचे दावे करण्यात आलेले असतात. मात्र, या मेहंदीमध्ये रासायनिक घटक असू शकतात. त्यामुळे त्याचा केसांवर दुष्परिणाम होऊ शकतो. तसेच काही अभ्यासात असे आढळून आले आहे की त्याचे डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतात. तुम्हाला जर मेहंदीचा उपयोग केसांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि केसांना मजबूत मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी करायचा असेल तर शक्यतो बाजारात मिळणारी साधी हिरव्या रंगाची मेहंदी पावडर घरी आणावी. ती किमान दोन तास पाण्यात भिजत घालावी. त्यानंतर या मेहंदीचा उपयोग करावा. यामुळे कोणत्याही रासायनिक घटकांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.

अतिवापरामुळे होऊ शकतात दुष्परिणाम

मेहंदी ही बहुगुणी असून केसांच्या समस्यांवर उपयोगी जरी असली तरी मेहंदीच्या अतिवापरामुळे केस रूक्ष देखील होऊ शकतात. त्यामुळे मेहंदीचा वापर तुमच्या केसांच्या आवश्यकतेप्रमाणे करावा.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in