प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद

Meta ने प्रायव्हसीबाबतच्या वादानंतर Instagram शी जोडलेलं ‘Muse Image’ AI फीचर बंद केलं आहे. सार्वजनिक फोटोचा वापर, Auto Opt-in आणि स्पष्ट संमतीच्या अभावावरून या फीचरला तीव्र विरोध झाला होता.
प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद
प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

इंस्टाग्रामवरील सार्वजनिक (Public) अकाउंटवरील फोटो वापरून एआय इमेज तयार करण्याची सुविधा देणारे Metaचे 'Muse Image' AI फीचर अखेर बंद करण्यात आले आहे. युझर्सच्या प्रायव्हसीबाबत निर्माण झालेल्या वादानंतर आणि जगभरातून झालेल्या टीकेनंतर Metaने हा निर्णय घेतला आहे.

Metaने काही दिवसांपूर्वी Meta AI अंतर्गत 'Muse Image' हे नवीन एआय इमेज जनरेशन फीचर सुरू केले होते. या टूलच्या मदतीने युझर्स सार्वजनिक इंस्टाग्राम अकाउंटवरील फोटोचा संदर्भ घेऊन एआय इमेज तयार करू शकत होते. तसेच तयार केलेल्या एआय फोटोमध्ये स्केच किंवा इतर बदल करून एडिट करण्याची सुविधाही देण्यात आली होती.

प्रायव्हसीवरून निर्माण झाला वाद

हे फीचर सुरू होताच अनेक युझर्सनी प्रायव्हसीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. सार्वजनिक अकाउंट असलेल्या अनेक युझर्सना कोणतीही स्पष्ट परवानगी न घेता या फीचरसाठी आपोआप (Auto Opt-in) समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे सोशल मीडियावर Metaवर मोठ्या प्रमाणात टीका झाली.

यापूर्वी अनेक तज्ज्ञांनी आणि डिजिटल हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांनी अशा एआय फीचरसाठी युझर्सची स्पष्ट संमती (Explicit Consent) आवश्यक असल्याचे म्हटले होते.

Metaने मान्य केली चूक

या वादानंतर Metaने अधिकृत निवेदन जारी करत, हे फीचर युझर्ससाठी एक क्रिएटिव्ह टूल म्हणून आणले होते आणि सार्वजनिक कंटेंटचा संदर्भ द्यायचा की नाही, यावर नियंत्रण देण्याचा उद्देश होता, असे स्पष्ट केले.

मात्र, युझर्सकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनंतर हे फीचर अपेक्षेप्रमाणे ठरले नसल्याचे कंपनीने मान्य केले. त्यामुळे 'Muse Image' फीचर आता उपलब्ध नसल्याची माहिती Metaने दिली.

कलाकार संघटनांचाही विरोध

एमी पुरस्कार विजेती अभिनेत्री हॅना आइनबाइंडर (Hannah Einbinder) हिनेही या फीचरवर टीका करत युझर्सना ते बंद करण्याचे आवाहन केले होते. तसेच कलाकार आणि मीडिया व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या SAG-AFTRA या संघटनेनेही या फीचरला विरोध दर्शवला होता.

संघटनेने एआयद्वारे कोणाच्याही फोटोचा वापर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची स्पष्ट संमती घेणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. परवानगीशिवाय डिजिटल प्रतिमा (Digital Replica) तयार होण्याचा धोका असल्याचाही इशारा देण्यात आला होता.

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद
Instagram Muse Image : तुमचं अकाउंट Public आहे? मग सावधान! मेटाचं AI फीचर वापरू शकतं तुमचे फोटो; 'असं' करा Opt Out

AI फीचर्सवर वाढते प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर एआयच्या माध्यमातून सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या फोटो आणि वैयक्तिक माहितीचा वापर कसा केला जातो, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. युझर्स, कंटेंट क्रिएटर्स आणि विविध संस्थांकडून एआय फीचर्समध्ये अधिक पारदर्शकता आणि स्पष्ट संमतीची मागणी होत आहे.

Metaने 'Muse Image' फीचर बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्रायव्हसीच्या मुद्द्यावर युझर्सना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in