उकाड्यात शरीराला मिळेल थंडावा; दूध, कलिंगड आणि सब्जापासून बनवा 'मोहब्बत का शरबत'

उकाड्यात शरीराला थंडावा देणारे 'मोहब्बत का शरबत' हे पेय सध्या खूप लोकप्रिय होत आहे. कलिंगड, दूध आणि सब्जापासून तयार होणारे हे लालचुटूक गारेगार सरबत घरच्या घरी अगदी सहज बनवता येते.
उकाड्यात शरीराला मिळेल थंडावा; दूध, कलिंगड आणि सब्जापासून बनवा 'मोहब्बत का शरबत'
उकाड्यात शरीराला मिळेल थंडावा; दूध, कलिंगड आणि सब्जापासून बनवा 'मोहब्बत का शरबत'
Published on

उन्हाळा सुरू झाला की उकाडा, घाम आणि थकवा यामुळे शरीराला सतत थंडावा देणाऱ्या पदार्थांची गरज भासते. अशा वेळी सरबत, फळांचे रस, ताक किंवा पन्हं यांसारखी गार पेये अनेकजण आवडीने पितात. अशाच उन्हाळ्यातील खास पेयांपैकी एक म्हणजे दिल्लीतील प्रसिद्ध ‘मोहब्बत का शरबत’. कलिंगड, दूध आणि सब्जा यापासून तयार होणारे हे लालचुटूक सरबत चविष्ट तर आहेच, पण शरीरालाही ताजेतवाने ठेवते.

विशेष म्हणजे हे सरबत बनवायला खूप सोपे आहे. घरात सहज मिळणाऱ्या साहित्यापासून काही मिनिटांत हे गारेगार पेय तयार करता येते. उन्हाळ्यात आईस्क्रिम किंवा कोल्ड ड्रिंकऐवजी मुलांना देण्यासाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

लागणारे साहित्य

  • कलिंगडाचे लहान तुकडे - सुमारे २०० ग्रॅम

  • सब्जा - ३० ग्रॅम (पाण्यात भिजवलेला)

  • रोज सिरप - ५० मि.ली.

  • बर्फाचे तुकडे - ३ ते ४

  • दूध - १ लिटर

कृती

सर्वप्रथम एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात सब्जा भिजत ठेवावा. काही वेळाने सब्जा चांगला फुलतो.

यानंतर कलिंगडाचे अगदी लहान तुकडे करून घ्यावेत. एका मोठ्या भांड्यात हे तुकडे घालून त्यात बर्फाचे खडे, भिजवलेला सब्जा आणि रोज सिरप घालावे.

त्यानंतर त्यात आधी उकळवून थंड केलेले दूध ओतावे. सर्व मिश्रण चमच्याने नीट हलवून एकत्र करावे.

शेवटी तयार झालेले सरबत ग्लासात ओतून वरून कलिंगडाचे काही तुकडे घालून सर्व्ह करावे. अधिक थंड हवे असल्यास हे सरबत काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून गार करूनही पिऊ शकता.

टिप्स

  • सरबत बनवताना दूध पूर्णपणे थंड झाल्यावरच वापरावे.

  • कलिंगडाचे तुकडे बिया काढून लहान करून घ्यावेत.

  • अधिक गार चव हवी असल्यास सर्व्ह करण्यापूर्वी काही वेळ फ्रिजमध्ये ठेवू शकता.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि चवीला गोडसर असे हे ‘मोहब्बत का शरबत’ घरच्या घरी अगदी सहज तयार करता येते.

logo
marathi.freepressjournal.in