“थोडी अजून झोप घेऊ…” असं म्हणत रोज दुपारपर्यंत झोपण्याची सवय तुम्हालाही आहे का? रात्री उशिरा झोपण्याची सवय सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालू राहिली, तर शरीराचा 'सर्केडियन रिदम' म्हणजेच नैसर्गिक वेळेची घडी पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते.
मुंबईतील ग्लेनेगल्स हॉस्पिटल, परळ येथील अंतर्गत औषध विभागाच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. मंजुषा अग्रवाल यांच्या मते, "ही नैसर्गिक वेळेची घडीच शरीरातील सर्वात महत्त्वाची यंत्रणा आहे जी झोप, हार्मोन्स, भूक, मेटाबॉलिझम आणि ऊर्जा यांचं संतुलन राखते."
दुपारपर्यंत झोपण्याचे परिणाम
'इंडियन एक्स्प्रेस'ने दिलेल्या माहितीनुसार डॉ. मंजूषा सांगतात, जरी तुम्ही ७ ते ९ तासांची झोप घेत असाल, तरी उशिरा झोपून उशिरा उठल्याने शरीरात ‘सोशल जेटलॅग’ निर्माण होतो.
सकाळी उठल्यावर सुस्ती येते, लक्ष केंद्रित होत नाही.
सकाळच्या सूर्यप्रकाशाचा अभाव मनःस्थिती बिघडवतो, तणाव वाढतो.
रात्री उशिरा खाणं आणि दिवसभर कमी हालचाल यामुळे वजन वाढतं.
इन्सुलिन रेझिस्टन्स वाढून मधुमेहाचा धोका वाढतो.
शरीरात सूज येते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
डॉ. अग्रवाल पुढे सांगतात, "अशा सवयींमुळे व्हिटॅमिन D ची कमतरता, सामाजिक नात्यांमध्ये ताण, आणि कामातील अस्थिरता दिसू शकते. जर सतत झोप येणं, निरुत्साह, किंवा खूप झोप घेण्याची गरज भासू लागली, तर तज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे."
मग काय कराल?
सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा.
दिवसा व्यायाम (धावणे, चालणे किंवा वजनाचे व्यायाम) करा.
संतुलित आहार घ्या आणि पुरेसं पाणी प्या.
झोपेचं वेळापत्रक निश्चित ठेवा. रोज ठरावीक वेळी झोपा आणि उठा.
धूम्रपान टाळा
डॉ. मंजुषा अग्रवाल सांगतात, "चांगली झोप शरीराला केवळ विश्रांती देत नाही, तर हार्मोन्स संतुलित ठेवते आणि त्वचेलाही तजेला देते."