आजपासून देशभरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे. नऊ दिवस देवी दुर्गेच्या विविध रुपांची पूजा करून सामर्थ्य आणि शक्तीची आराधना केली जाते. या उत्सवात अनेक भाविक पायात चप्पल न घालता अनवाणी चालण्याची प्रथा पाळतात. पण ही परंपरा नेमकी का पाळली जाते, तिच्यामागे धार्मिक तसेच आरोग्यदायी कारणं कोणती आहेत, हेच आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
अनवाणी चालण्यामागे धार्मिक आणि वैद्यकीय महत्व :
नवरात्रीत केवळ महिला नव्हे तर काही पुरुष मंडळीदेखील नऊ दिवस पायात वाहना घालत नाही. नावरात्रोत्सवात अनवाणी चालण्याची पद्धत खूपच जुनी आहे. पण हिंदू सणांची खासियत म्हणजे हे सण केवळ धार्मिक नव्हे तर वैद्यकीय कारणांमुळे देखील साजरे करणे महत्वाचे मानले जाते.
धार्मिक महत्व :
नवरात्रीमध्ये सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झालेले असते. यादरम्यान देवी दुर्गेचा वावर पृथ्वीतलावर होत असतो, असे मानले जाते. तसेच आपण जेव्हा कधी मंदिरात तसेच एखाद्या पवित्र जागेत प्रवेश करताना, अशुद्धता आणि मानसिक ओझे मागे सोडून देण्यासाठी पायातले शूज बाहेर काढतो. मंदिरात तसेच घरात चप्पल काढूनच प्रवेश केला जातो, मुळात पूर्वापार चालत आलेल्या या जुन्या परंपरेमुळे परिसर स्वच्छ करण्याची आणि पर्यावरणाशी संबंध जोडण्याची संधी माणसांना मिळते.
वैद्यकीय महत्व :
अनवाणी चालणे केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नाही, तर त्याला शास्त्रीय आधार देखील आहे. पायाच्या तळव्यांमध्ये ॲक्युपंक्चर पॉइंट्स असतात जे शरीरातील महत्त्वाच्या अवयवांशी जोडलेले असतात. जमिनीचा थेट स्पर्श झाल्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते, रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो, उच्च रक्तदाब नियंत्रणात येतो, हृदयविकाराचा धोका घटतो आणि हाडं मजबूत होतात.
नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कधी आणि कशी सुरू झाली?
नवरात्रीत अनवाणी चालण्याची सुरुवात घटस्थापनेच्या प्रथेपासून सुरू झाली आहे. यादरम्यान घटाभोवती माती टाकली जाते, आणि त्यात धान्याची रुजवण केली जाते. ज्यामुळे मातीचा स्पर्श होऊन भक्तांना निसर्गाशी जोडण्यास ही प्रथा मदत करते. मातीशी नाळ जोडली जावी आणि मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा, या हेतूने भाविक नवरात्रीत चप्पला घालत नाहीत.
पायांचे स्नायू मजबूत होतात - पायात चप्पल किंवा बूट नसल्यामुळे पायाच्या तळव्यांवर नैसर्गिक दाब येतो. यामुळे पायातील लहान-मोठ्या स्नायूंना व्यायाम मिळतो, स्नायू अधिक लवचिक होतात आणि संतुलन सुधारते. दीर्घकाळात पायातील वेदना, सूज किंवा थकवा कमी होण्यास मदत होते.
तणाव कमी करण्यास उपयुक्त - जमिनीचा थेट स्पर्श शरीरातील विद्युत उर्जेला संतुलित ठेवतो. यामुळे मेंदूतील कोर्टिसोल (तणाव वाढवणारे हार्मोन) कमी होऊन मन शांत राहते. अनवाणी चालताना मिळणाऱ्या नैसर्गिक स्पर्शामुळे चिंता आणि ताण कमी होतो, ज्यामुळे दिवस अधिक ऊर्जायुक्त आणि आनंदी वाटतो.
चांगली झोप लागते - अनवाणी चालल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील ऊर्जा संतुलित होते. यामुळे रात्री शरीराला पुरेशी विश्रांती मिळून गाढ आणि आरामदायी झोप लागते. नियमितपणे बागेत किंवा मोकळ्या जागेत अनवाणी चालणाऱ्या लोकांना झोपेच्या समस्या कमी जाणवतात.