Navratri 2026 : उपवासाच्या ताटात चवदार ट्विस्ट; ट्राय करा बीट-मखाण्याचा रायता

बीटमुळे रायत्याला नैसर्गिक गोडवा आणि आकर्षक रंग मिळतो, तर भाजलेले मखाणे आणि शेंगदाणे त्याला कुरकुरीतपणा देतात. चला तर जाणून घेऊया या रायत्याची सोपी रेसिपी.
Navratri 2026 : उपवासाच्या ताटात चवदार ट्विस्ट; ट्राय करा बीट-मखाण्याचा रायता
Navratri 2026 : उपवासाच्या ताटात चवदार ट्विस्ट; ट्राय करा बीट-मखाण्याचा रायता'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेक जण उपवास करतात. उपवासासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा खीर, राजगिरा पराठा असे नेहमीचे पदार्थ केले जातात. मात्र, रोज तेच पदार्थ खाण्याचा कंटाळा येत असेल, तर काहीतरी वेगळे आणि चविष्ट पदार्थ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. बीट, दही, काकडी, गाजर आणि मखाणा यांचा वापर करून तयार होणारे बीट-मखाण्याचा रायता हा त्यासाठी एक चांगला पर्याय आहे. हा रायता कमी वेळात तयार होतो. बीटमुळे रायत्याला नैसर्गिक गोडवा आणि आकर्षक रंग मिळतो, तर भाजलेले मखाणे आणि शेंगदाणे त्याला कुरकुरीतपणा देतात. चला तर जाणून घेऊया या रायत्याची सोपी रेसिपी.

साहित्य :

  • १ कप दही

  • १ मध्यम आकाराचे बीट, किसलेले

  • १ गाजर, किसलेले

  • १ काकडी, बारीक चिरलेली

  • १ चमचा भिजवलेले चिया सीड्स

  • भाजलेले जिरेपूड

  • चवीनुसार मीठ

  • बारीक चिरलेली कोथिंबीर

  • भाजलेले मखाणे

  • भाजलेले शेंगदाणे

  • डाळिंबाचे दाणे

कृती :

१. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही घ्या. दही घट्ट असल्यास आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून ते एकजीव करा.

२. त्यात किसलेले बीट, किसलेले गाजर आणि बारीक चिरलेली काकडी घाला.

३. आता त्यात भिजवलेले चिया सीड्स, भाजलेली जिरेपूड, चवीनुसार मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा.

४. तयार मिश्रणावर भाजलेले मखाणे, भाजलेले शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे घाला.

५. वरून थोडी कोथिंबीर भुरभुरवा. अशा प्रकारे चविष्ट आणि रंगीबेरंगी बीट-मखाण्याचे रायते खाण्यासाठी तयार होईल.

बीट-मखाण्याचे रायते बनवताना लक्षात ठेवा 'या' टिप्स

१. दह्याची निवड: रायते चविष्ट होण्यासाठी ताजे आणि घट्ट दही वापरा. दही आंबट असल्यास रायत्याची चव बदलू शकते.

२. मखाणे शेवटी घाला: मखाणे आधीच घातल्यास ते दह्यामुळे मऊ होऊ शकतात. त्यामुळे रायते खाण्याच्या अगदी आधी मखाणे घाला, म्हणजे त्यांचा कुरकुरीतपणा टिकून राहील.

३. थंडगार रायते अधिक चविष्ट: रायते तयार केल्यानंतर थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवल्यास ते अधिक ताजेतवाने लागेल. मात्र, मखाण्याचे टॉपिंग सर्व्ह करतानाच घाला.

Navratri 2026 : उपवासाच्या ताटात चवदार ट्विस्ट; ट्राय करा बीट-मखाण्याचा रायता
Navratri 2026 : उकडलेल्या रताळ्यांना द्या कुरकुरीत ट्विस्ट; उपवासासाठी 'असा' बनवा झटपट चाट

४. मीठ आणि मसाल्यांचे प्रमाण: मीठ आणि जिरेपूड आपल्या आवडीनुसार घाला. उपवासासाठी नेहमीचे मीठ चालते की सैंधव मीठ वापरायचे, हे आपल्या उपवासाच्या नियमांनुसार ठरवा.

५. साहित्य तपासून घ्या: उपवासात दही, चिया सीड्स, शेंगदाणे आणि इतर पदार्थ चालतात का, हे आपल्या घरच्या परंपरेनुसार तपासा. शेंगदाण्यांची अ‍ॅलर्जी असल्यास ते टाळा.

उपवासाच्या मेनूमध्ये वेगळा पदार्थ समाविष्ट करायचा असेल, तर हे बीट-मखाण्याचे रायते नक्की करून पाहा. दही, भाज्या आणि कुरकुरीत टॉपिंग यांचा मिलाफ या रायत्याला खास चव देतो.

logo
marathi.freepressjournal.in