
नवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासाचा सण. या नऊ दिवसांत अनेकजण हलके आणि सात्विक पदार्थ खातात, जे शरीरास ऊर्जा देतात आणि मन ताजेतवाने ठेवतात. अशावेळी काय खाणे योग्य ठरेल, हे समजून घेण्यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी उपवासाच्या काळात खाण्यासाठी चार अत्यंत पोषक आणि शक्तिवर्धक पदार्थ सुचवले आहेत, जे शरीराला ताकद देतात आणि मन हलके आणि उत्साही ठेवतात.
१. राजगिरा
राजगिरा उपवासात खाण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. लाडू, थालीपीठ, भाकरी किंवा चिक्की अशा विविध प्रकारे त्याचा समावेश करता येतो. राजगिरामध्ये लोह मुबलक प्रमाणात असतो, जो हिमोग्लोबिनची पातळी टिकवतो, अशक्तपणा टाळतो आणि शरीराला ऊर्जा पुरवतो. नियमित सेवनाने केसांचे आरोग्य सुधारते, त्वचा चमकदार राहते आणि शारीरिक ताकद टिकते. उपवासात लोहयुक्त पदार्थ घेणे खूप गरजेचे असते.
२. काजू
काजू हा मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत आहे. जर रात्री पाय दुखत असतील, गॅस होत असेल किंवा झोप न येत असेल, तर काजू खाल्ल्याने आराम मिळतो. यातील मॅग्नेशियम झोप सुधारतो, शरीराला ऊर्जा पुरवतो आणि पचनक्रिया मजबूत ठेवतो. उपवासात थोड्या प्रमाणात काजू खाल्ल्याने शरीरास आवश्यक खनिजे मिळतात.
३. केळी
केळी उपवासात अनिवार्य मानली जाते, कारण त्यात व्हिटॅमिन बी६ मुबलक प्रमाणात असते. यामुळे मूड सकारात्मक राहतो, तणाव कमी होतो आणि मासिक पाळीपूर्वी होणाऱ्या वेदना कमी होतात. केळ्यांमध्ये असलेले प्रीबायोटिक गुणधर्म पचनसंस्था निरोगी ठेवतात आणि आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. केळी खाल्ल्याने ऊर्जा मिळते, पचन सुधारते आणि मन प्रसन्न राहते.
४. डाळी आणि अंकुरलेले धान्य
अंकुरलेल्या डाळी आणि धान्याचा समावेश उपवासात केल्यास प्रथिने आणि अमिनो आम्ले मिळतात. हरभरा, चवळी, राजमा इत्यादी डाळी भिजवून, अंकुरित करून भाजीमध्ये किंवा हलक्या शाकाहारी पदार्थांमध्ये खाणे फायदेशीर ठरते. हे हाडे मजबूत ठेवतात, मेंदू निरोगी करतात, ऊर्जा टिकवून ठेवतात आणि पोट जास्त काळ भरलेले राहते.
ऋजुता दिवेकर यांच्या मते, नवरात्रात या चार पदार्थांचा समावेश केल्यास उपवास अधिक पोषक, ऊर्जा देणारा आणि शरीरास तंदुरुस्त ठेवणारा ठरतो. फक्त उपवास नाही, तर तो शरीर आणि मनासाठी शक्तिवर्धक अनुभव बनतो.
(Disclaimer: ही माहिती आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)