

लग्न, नातेसंबंध काळानुसार बदलत जातात. रोजची धावपळ, कामाचा ताण, जबाबदाऱ्या आणि ठरलेला दिनक्रम यामुळे हळूहळू जोडीदारांमधला भावनिक संवाद कमी होऊ लागतो. यात प्रेम कमी होत नाही, मात्र मनातल्या भावना मोकळेपणाने व्यक्त करणं थांबतं आणि नेमकं इथूनच नात्यात दुरावा निर्माण होतो. मात्र दीर्घकाळ टिकणाऱ्या नात्यांची खरी किल्ली ही मनमोकळ्या आणि प्रामाणिक संवादातच असते.
कधी कधी मोठ्या सरप्राईजेस किंवा खर्चिक गोष्टींपेक्षा अगदी साध्या सवयी नात्यात पुन्हा जवळीक निर्माण करतात. अशाच एका सोप्या पण प्रभावी उपायाबद्दल न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध वकील जेम्स सेक्स्टन (James Sexton) यांनी सांगितलं आहे. त्यांच्या मते, ही छोटी सवय काही वेळा लग्न वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकते. जेम्स सेक्स्टन हे अनेक वर्षांपासून घटस्फोट आणि कौटुंबिक वादांची प्रकरणं हाताळत आहेत. अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी ‘वॉक अँड टॉक’ ही सोपी थिअरी सांगितली. जेम्स यांच्या मते, ही पद्धत इतकी परिणामकारक आहे की बऱ्याचदा ती कोर्टाच्या आदेशापेक्षाही अधिक प्रभावी ठरते.
'वॉक अँड टॉक' म्हणजे काय?
आठवड्यातून किमान एकदा तरी जोडीदारांनी जाणीवपूर्वक वेळ काढून एकत्र चालायला जायचं. मात्र हा केवळ फेरफटका नसून, त्यामागे एक ठरलेला उद्देश असतो. या वेळी दोघांनीही एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधायचा. त्या आठवड्यात तुम्ही असं काय केलं ज्यामुळे तुमच्या जोडीदाराला आनंद झाला, तसेच तुमचं कोणतं वागणं किंवा बोलणं समोरच्या व्यक्तीला खटकलं, हे अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे एकमेकांशी शेअर करायचं. या संवादात दोषारोप नाहीत, भांडण नाही, किंवा बचावात्मक बोलणंही नाही. फक्त मनातल्या भावना मांडायच्या आणि समोरच्याने त्या शांतपणे ऐकून घ्यायच्या. मात्र आठवड्यात जोडीदाराने केलेल्या तीन प्रेमळ गोष्टीसुद्धा आठवत नसतील किंवा सांगता येत नसतील, तर तो नात्यासाठी एक गंभीर इशारा ठरू शकतो, असं जेम्स सांगतात.
'वॉक अँड टॉक'मुळे जोडीदारांमध्ये मनमोकळा संवाद होतो. यात छोट्या - छोट्या गोष्टी वेळेत शेअर केल्याने त्या मोठ्या वादात रूपांतरित होत नाहीत. भावनिक जवळीक वाढते आणि एकमेकांना समजून घेणं अधिक सोपं होतं.
नातं मजबूत ठेवण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टींची गरज नसते. एकमेकांना दिलेला थोडासा वेळ, प्रामाणिक संवाद आणि जोडीदाराचं शांतपणे ऐकून घेण्याची तयारी, हीच ‘वॉक अँड टॉक’ची खरी ताकद आहे. नात्यात दुरावा जाणवत असेल, तर ही साधी सवय अनेकांसाठी नातं वाचवणारी ठरू शकते.