तुम्हालाही पनीर खायला खूप आवडतं का? पनीर म्हणजे केवळ पदार्थ नाही, तर घरच्या स्वयंपाकात मजा आणि स्वाद वाढवणारा खास घटक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ, तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये ट्राय केला की संध्याकाळच्या किंवा दिवसभराच्या भुकेला सहज भागवता येतो. जर तुम्ही पनीरच्या वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करण्याचे शौकीन असाल, तर आम्हीही घेऊन आलोय एक खास रेसिपी – पनीर गोल्डन फ्राय. झटपट बनणारा हा पदार्थ घरच्या प्रत्येकाला नक्कीच आवडेल.
चला तर मग, पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य :
पनीर
मीठ
कॉर्नफ्लोर
मैदा
चाट मसाला
आलं-लसूण पेस्ट
लाल तिखट
तेल
कृती :
सर्वप्रथम पनीर पाण्याने स्वच्छ धुवून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. एका वाटीत मैदा, कॉर्नफ्लोर, लाल तिखट, चाट मसाला, आलं-लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ मिसळून व्यवस्थित मिश्रण तयार करा. मिश्रण जाडसर पेस्टसारखे होईपर्यंत त्यात थोडे थोडे पाणी घाला. तयार मिश्रणात पनीरचे तुकडे टाकून नीट माखून घ्या, जेणेकरून सर्व बाजूंनी मसाला लागेल. कढईत तेल गरम करून त्यात पनीरचे तुकडे दोन्ही बाजूने सोनेरी होईपर्यंत फ्राय करा. फ्राय झाल्यानंतर त्यावर थोडा चाट मसाला शिंपडून नीट मिसळा आणि पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
या सोप्या पद्धतीने झटपट आणि चमचमीत पनीर गोल्डन फ्राय तयार होतो, जो लहान-मोठ्यांमध्ये सगळ्यांना नक्की आवडेल.