

आरोग्य आणि चव यांचा अप्रतिम संगम म्हणजे पनीर. भारतीय आहारात पनीरला विशेष स्थान आहे. काहींना पनीर खूप आवडते, तर काहींना फारसे नाही; पण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर पनीर हे प्रत्येकाच्या आहारात असावे असे एक पोषक घटकांनी भरलेले अन्न आहे.
शाकाहाऱ्यांसाठी प्रथिनांचा खजिना
मांस न खाणाऱ्या शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत म्हणजे पनीर. १०० ग्रॅम पनीरमध्ये सुमारे १८ ग्रॅम प्रथिने असतात, जे स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आणि शरीरातील पेशींच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे.
वजन नियंत्रणासाठी उपयोगी
पनीरमध्ये असणारे कॉनज्युगेटेड लिनोलिक ॲसिड (CLA) नावाचे फॅटी ॲसिड शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी हे उत्तम पर्याय ठरू शकते. पनीरमधील प्रथिने हळूहळू पचतात, त्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते आणि भूक नियंत्रणात राहते.
हाडे आणि दात मजबूत ठेवते
पनीर हे कॅल्शियम आणि फॉस्फरसचे उत्तम स्त्रोत आहे. हे दोन्ही घटक हाडांच्या घनतेसाठी आणि दातांच्या मजबुतीसाठी आवश्यक आहेत. नियमितपणे मर्यादित प्रमाणात पनीर खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात आणि दातांचे आरोग्य टिकून राहते.
हृदय आणि कॅन्सरपासून बचाव
पनीरमधील नैसर्गिक फॅटी ॲसिड्स रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात. तसेच काही संशोधनानुसार, पनीरमधील घटक शरीरातील कॅन्सरजन्य पेशींची वाढ रोखण्यास हातभार लावतात. त्यामुळे ते हृदयविकार आणि कॅन्सरपासून बचावासाठी उपयोगी ठरते.
तज्ज्ञांचा सल्ला - मर्यादेतच सेवन करा
आहारतज्ज्ञ श्रुती देशपांडे यांच्या मते, पनीर हा आरोग्यासाठी लाभदायक घटक असला तरी अति प्रमाणात सेवन टाळावे. पनीरमध्ये कॅलरीज आणि फॅटचे प्रमाण जास्त असल्याने हृदयरोग, मधुमेह किंवा कोलेस्टेरॉलची समस्या असणाऱ्यांनी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच खावे.
घरच्या घरी बनवा पौष्टिक पदार्थ
बाजारातील तेलकट पनीर पदार्थांपेक्षा घरी केलेले पदार्थ आरोग्यदायी असतात. पनीर भुर्जी, पनीर सलाड, पनीर टिक्का, पनीर सूप असे अनेक प्रकार सहज घरच्या घरी तयार करता येतात.
थोडक्यात सांगायचे तर, पनीर हा फक्त चवीसाठी नाही, तर आरोग्य टिकवण्यासाठीही उपयुक्त आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहारासोबत घेतले, तर हे प्रत्येक वयोगटासाठी ‘सुपरफूड’ ठरू शकते.