
पालक होणं ही आयुष्यातली सर्वात मोठी जबाबदारी असते. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी प्रत्येक आई-वडील झटत असतात. पण, नकळत त्यांच्याकडून काही अशी वागणूक होत असते जी मुलांच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करते. अनेक वेळा अशा कृतींमुळे मुलांमध्ये चिंता (Anxiety) वाढते, आत्मविश्वास ढासळतो आणि ते कायम निराश राहू लागतात. जाणून घ्या अशाच ६ पालकत्वाशी संबंधित चुका, ज्या टाळणं गरजेचं आहे.
१. सतत आपल्या अडचणी मुलांसमोर बोलणं
कधी कधी पालक आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक चिंता थेट मुलांसमोर बोलून मोकळे होतात. पण, मुलांची त्या समस्या समजण्याची पूर्ण तयारी नसते. त्यामुळे ते त्या गोष्टी मनावर घेतात आणि त्यातून भीती किंवा अपराधीपणाची भावना तयार होते, जी नंतर एंग्जायटीमध्ये बदलते.
२. अतिसंरक्षणात्मक वागणूक (Overprotectiveness)
मुलांची काळजी घेणे आवश्यक आहे, पण प्रत्येक गोष्टीत अतिहस्तक्षेप करणे त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेते. त्यामुळे मुलं नवीन गोष्टींना सामोरं जाणं टाळतात आणि आत्मविश्वासही गमावतात.
३. प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म नियंत्रण
मुलांनी काय घालावे, कोणासोबत बोलावे, कुठे खेळावे यासारख्या गोष्टींमध्ये जास्त ढवळाढवळ केल्यास, त्यांना स्वतःचे निर्णय घेणे अवघड वाटू लागते. त्यामुळे त्यांच्यात स्वावलंबनाची भावना निर्माण होत नाही आणि निर्णयाच्या क्षणी ते गोंधळून जातात.
४. सतत चुका दाखवणे आणि टोचून बोलणे
शिस्त लावणे गरजेचे असले तरी प्रत्येक लहानसहान गोष्टींत मुलांना ओरडल्यास, त्यांच्या मनात चुकीची भावना निर्माण होऊ लागते. त्यांना वाटू लागते की, ते काहीच बरोबर करू शकत नाहीत. ही भावना दीर्घकाळ त्यांच्या मनात घर करून बसते आणि आत्मविश्वास खचतो.
५. अति-महत्वाकांक्षा आणि दबाव
पालकांनी अपेक्षा ठेवणं स्वाभाविक आहे, पण काही वेळा या अपेक्षा मुलांना गुदमरवणाऱ्या ठरतात. अभ्यास, खेळ, गुण मिळवणे या प्रत्येक बाबतीत परिपूर्ण होण्याचा तगादा लावल्याने मुले स्वतःला कमी समजू लागतात. यामुळे त्यांच्यात न्यूनगंड आणि चिंता वाढू शकते.
६. ‘गिल्टी’ फील करवणं
"आम्ही तुझ्यासाठी खूप केलंय, तू आमचं ऐकलं पाहिजे" , अशा प्रकारचं बोलणे मुलांच्या मनावर दडपण टाकते. अशा वाक्यांमुळे ते नेहमी अपराधी वाटून घेतात आणि मनासारखे जगण्याऐवजी कायम दबावात राहू लागतात. दीर्घकाळ असे सुरू राहिल्यास, ही भावना तीव्र चिंता बनू शकते.
पालकत्व हे प्रेम, समजूत आणि संयमाचं नातं आहे. फक्त शिस्तीपेक्षा समजून घेणं आणि सकारात्मक मार्गदर्शन देणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं आजच्या काळात अधिक महत्त्वाचं ठरतंय. योग्य वेळेस चुका सुधारल्या तर एक समतोल आणि आनंदी पालकत्व अनुभवता येईल.