

धूळ, प्रदूषण, उन्हाचा संपर्क आणि धावपळीची जीवनशैली यामुळे त्वचेची चमक कमी होणे ही आजकाल सामान्य समस्या झाली आहे. अनेकदा एखाद्या समारंभाला किंवा खास कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसते. अशावेळी पार्लरमध्ये जाऊन फेशियल करण्यासाठी वेळ नसल्यास काही घरगुती उपाय मदतीला येऊ शकतात. त्यापैकी एक म्हणजे बटाट्याचा वापर.
बटाट्यामध्ये नैसर्गिक एन्झाइम्स आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे त्वचेवरील टॅनिंग, डाग आणि निस्तेजपणा कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
बटाट्याच्या मदतीने झटपट ग्लो मिळवण्याची सोपी पद्धत
हा उपाय करण्यासाठी एक ताजा बटाटा घ्या आणि त्याचे दोन भाग करा.
यानंतर बटाट्याच्या कापलेल्या भागावर हलक्या हाताने काही रेघा काढा. आता त्यावर चिमूटभर हळद, थोडे तांदळाचे पीठ आणि काही थेंब मध घाला.
हे मिश्रण असलेला बटाट्याचा भाग चेहऱ्यावर गोलाकार पद्धतीने ५ ते ६ मिनिटे फिरवा. त्यानंतर १० मिनिटे तसेच राहू द्या आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून टाका.
बटाट्याचा फेसपॅकही ठरू शकतो फायदेशीर
त्वचेला अधिक ताजेपणा आणि चमक देण्यासाठी बटाट्याचा फेसपॅकही वापरता येऊ शकतो.
साहित्य
बटाट्याचा रस
थोडी कॉफी पावडर
थोडी पिठीसाखर
थोडे बेसन
दही
कृती
बटाट्याचा रस काढून त्यामध्ये कॉफी, पिठीसाखर, बेसन आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर हलक्या हाताने मसाज करत चेहरा स्वच्छ धुवा.
बटाटा त्वचेसाठी का उपयुक्त मानला जातो?
त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत करू शकतो.
चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करण्यास सहाय्य करू शकतो.
त्वचेला ताजेपणा आणि नैसर्गिक चमक देण्यास मदत होऊ शकते.
त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करू शकतो.
किती वेळा वापरावा?
हा उपाय आठवड्यातून २ ते ३ वेळा केला जाऊ शकतो. मात्र, संवेदनशील त्वचा असल्यास कोणताही उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे.
टीप: घरगुती उपायांचा परिणाम व्यक्तीनुसार वेगळा असू शकतो. त्वचेची समस्या गंभीर असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.