

राधिका मर्चंट-अंबानी आपल्या हटके फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. पारंपरिक भारतीय पोशाखांना आधुनिक फॅशनची जोड देत ती प्रत्येक वेळी खास लूकमध्ये दिसते. यावेळीही राधिकाने रंगीबेरंगी लेहेंग्यातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेल्या या पोशाखात भारतीय वस्त्रकला, सुंदर भरतकाम आणि पारंपरिक कारागिरीचा सुरेख संगम पाहायला मिळतो. तिच्या या राजेशाही लूकचे फोटो मनीष मल्होत्राने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनसळी लेहेंग्यावर रंगीबेरंगी फुलांची नक्षी
राधिकाच्या या लूकमधील सर्वात खास आकर्षण म्हणजे हाताने विणलेला ब्रोकेड लेहेंगा. या लेहेंग्यावर फुलांचे सुंदर भरतकाम करण्यात आले आहे. त्यावर फिरोजी, मिंट ग्रीन, गुलाबी आणि फिकट जांभळ्या रंगांच्या छटा उठून दिसतात. विविध रंगांच्या या नक्षीमुळे लेहेंग्याला एक वेगळाच शाही लूक मिळाला आहे.
ब्लाऊजचीही खास कलाकुसर
लेहेंग्याला साजेसा ब्लाऊजही तितकाच आकर्षक आहे. ब्लाऊजवर विविध रंगांच्या फुलांची नक्षी आणि बारकाईने केलेले भरतकाम पाहायला मिळते. लेहेंग्याच्या रंगसंगतीशी जुळणाऱ्या या ब्लाऊजमुळे राधिकाचा संपूर्ण पोशाख अधिक देखणा दिसत आहे.
बांधणी दुपट्ट्याने वाढवली लूकची शोभा
राधिकाच्या या लूकमध्ये विशेष लक्ष वेधून घेतो तो ओम्ब्रे शैलीतील बांधणी दुपट्टा. फिरोजीपासून मिंट ग्रीनपर्यंतच्या रंगछटा एकमेकांत सुंदरपणे मिसळलेल्या दिसतात. दुपट्ट्याच्या पदरावर ब्रोकेडची नक्षी असून कडांना स्फटिकांनी सजवलेले नाण्यांच्या आकाराचे नाजूक लटकन लावण्यात आले आहेत. त्यामुळे दुपट्ट्याला आकर्षक झळाळी मिळाली आहे.
दागिन्यांनी खुलला राजेशाही अंदाज
या रंगीबेरंगी लेहेंग्यासोबत राधिकाने पारंपरिक दागिन्यांची निवड केली. अनेक थरांचा हार, त्याला साजेसे कानातले आणि हातात घातलेल्या बांगड्या असा तिचा दागिन्यांचा साज होता. दागिन्यांची सोनसळी छटा लेहेंग्याच्या रंगाशी सुंदरपणे जुळून आली होती. विशेष म्हणजे, दागिने उठावदार असूनही लेहेंग्यावरील नक्षीकामाचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
मनीष मल्होत्राने केला भारतीय कारागिरीचा गौरव
डिझायनर मनीष मल्होत्राने राधिकाच्या या लूकचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोशाखातून रंग, भारतीय वस्त्रपरंपरा आणि कारागिरांच्या कलाकुसरीचा उत्सव साजरा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पारंपरिक विणकाम आणि भरतकामाला आधुनिक फॅशनची जोड देत हा खास पोशाख तयार करण्यात आला आहे. राधिकाच्या या राजेशाही लूकमधून भारतीय पारंपरिक फॅशनचे सौंदर्य पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.