महागडा फोन पावसात भिजला? नुकसान टाळण्यासाठी लगेच करा 'या' गोष्टी

पावसात स्मार्टफोन भिजला तर घाबरू नका. फोन सुरक्षितपणे कोरडा करण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि हेअर ड्रायर, तांदूळ यांसारख्या कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.
महागडा फोन पावसात भिजला? नुकसान टाळण्यासाठी लगेच करा 'या' गोष्टी
महागडा फोन पावसात भिजला? नुकसान टाळण्यासाठी लगेच करा 'या' गोष्टी
Published on

पावसाळ्यात अचानक आलेल्या सरींमुळे मोबाईल फोन भिजण्याची शक्यता असते. फोनमध्ये पाणी गेलं की तो लगेच चार्जिंगला लावण्याची किंवा हेअर ड्रायरने वाळवण्याची घाई अनेकजण करतात. मात्र, अशा वेळी चुकीची पद्धत वापरल्यास फोनचं नुकसान आणखी वाढू शकतं.

फोन पावसात भिजला असेल तर सर्वात आधी तो बंद करणं आणि फोनच्या स्क्रीनवर किंवा बॉडीवर दिसणारं पाणी हलक्या हाताने पुसणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत चार्जिंग किंवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न टाळा. फोन वाचवण्यासाठी या काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.

१. सर्वात आधी फोन बंद करा

फोन भिजल्यानंतर तो सुरू असेल तर शक्य तितक्या लवकर स्विच ऑफ करा. पाणी आणि विजेचा संपर्क आल्याने फोनच्या अंतर्गत भागांचं नुकसान होऊ शकतं. फोन बंद केल्यानंतर तो पुन्हा सुरू करण्याचा किंवा चार्जिंगला जोडण्याचा प्रयत्न करू नका.

२. सिम कार्ड बाहेर काढा

फोन बंद केल्यानंतर सिम ट्रे बाहेर काढा. मेमरी कार्ड असल्यास तेही वेगळं करा. जुन्या फोनमध्ये बॅटरी काढता येत असेल तर ती काढू शकता. मात्र, आजच्या अनेक स्मार्टफोनमध्ये बॅटरी आतून फिट केलेली असते. अशावेळी फोन स्वतः उघडण्याचा प्रयत्न करू नका.

महागडा फोन पावसात भिजला? नुकसान टाळण्यासाठी लगेच करा 'या' गोष्टी
फ्रिजवर कव्हर घालता? मग ही बातमी एकदा नक्की वाचा; कंपन्या का देतात 'नो कव्हर'चा सल्ला?

३. बाहेरचं पाणी मऊ कापडाने पुसा

फोनच्या स्क्रीनवर किंवा बॉडीवर दिसणारं पाणी मऊ, कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसून घ्या. चार्जिंग पोर्ट किंवा स्पीकरमध्ये वस्तू, कापूस किंवा इतर काहीही जबरदस्तीने घालू नका. त्यामुळे आतल्या भागाचं नुकसान होऊ शकतं.

४. फोनला नैसर्गिक हवा लागू द्या

फोन कोरड्या आणि हवेशीर जागी ठेवा. पंख्याची साधी हवा मिळेल अशा ठिकाणी फोन ठेवणं उपयोगी ठरू शकतं. फोन पूर्णपणे कोरडा होईपर्यंत त्याचा वापर किंवा चार्जिंग टाळणं चांगलं.

५. सिलिका जेलचा वापर करू शकता

घरात सिलिका जेलची पाकिटं उपलब्ध असतील तर फोन त्यांच्यासोबत कोरड्या, बंद कंटेनरमध्ये ठेवू शकता. मात्र, सिलिका जेल थेट फोनच्या पोर्टमध्ये किंवा त्यावर चिकटवू नका. फोन पुरेसा वेळ कोरडा होऊ द्या आणि त्यानंतरच तो सुरू करण्याचा प्रयत्न करा.

महागडा फोन पावसात भिजला? नुकसान टाळण्यासाठी लगेच करा 'या' गोष्टी
रेल्वेच्या AC डब्यात चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशाचा VIDEO चर्चेत; अशी चूक करू नका; प्रवासात 'या' वस्तू आहेत बॅन!

चुकूनही करू नका 'या' दोन गोष्टी

हेअर ड्रायरची गरम हवा देऊ नका : फोन लवकर वाळवण्यासाठी हेअर ड्रायर वापरणं योग्य नाही. जास्त उष्णतेमुळे फोनच्या अंतर्गत भागांचं नुकसान होऊ शकतं.

तांदळाच्या डब्यात फोन ठेवू नका : फोन सुकवण्यासाठी तांदळाचा वापर करण्याची जुनी पद्धत प्रचलित आहे. मात्र, तांदळाचे बारीक कण फोनच्या पोर्ट किंवा इतर उघड्या भागात जाऊ शकतात. त्यामुळे ही पद्धत टाळलेलीच चांगली.

फोनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गेलं असेल, तो सतत बंद पडत असेल किंवा सुरूच होत नसेल, तर घरच्या घरी प्रयोग करण्याऐवजी अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये तपासणी करून घेणं सुरक्षित ठरेल.

(Disclaimer: ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी देण्यात आली आहे. फोनच्या मॉडेलनुसार काळजी घेण्याची पद्धत वेगळी असू शकते. फोनमध्ये पाणी गेल्यास नुकसान टाळण्यासाठी संबंधित कंपनीच्या मार्गदर्शक सूचनांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

logo
marathi.freepressjournal.in