

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत लोणच्यांची तयारी सुरू होते. आंबा, लिंबू किंवा मिरचीचे लोणचे अनेकांच्या आवडीचे असते. त्यातही राजस्थानी स्टाइल लाल मिरचीचं लोणचं हे तिखट, मसालेदार आणि झणझणीत चवीमुळे खास ओळखले जाते.
मोहरीचं तेल, विविध मसाले आणि लाल मिरच्यांचा परफेक्ट मेळ या लोणच्याला वेगळीच चव देतो. पोळी, पराठा किंवा साध्या वरण-भातासोबतही हे लोणचं खूप छान लागतं. उन्हाळ्यात योग्य पद्धतीने बनवल्यास हे लोणचं अनेक दिवस टिकू शकतं.
साहित्य :
५०० ग्रॅम लाल मिरच्या
४ टेबलस्पून धणे
४ टेबलस्पून बडीशेप
२ टेबलस्पून जिरे
३ टेबलस्पून पिवळी मोहरी
२ टेबलस्पून मोहरी
१ टेबलस्पून काळी मिरी
३ टेबलस्पून मेथी दाणे
१ टेबलस्पून ओवा
चवीनुसार मीठ
२ ते ३ टेबलस्पून लाल तिखट
१ टेबलस्पून हळद
२ टेबलस्पून काळे जिरे
१/२ टीस्पून हिंग
१/२ टेबलस्पून काळं मीठ
१ टेबलस्पून आमचूर पावडर
१/२ लिटर मोहरीचं तेल
कृती :
मिरच्या तयार करा
लाल मिरच्या स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरड्या करा. नंतर त्यांना मध्ये चिर देऊन त्यातील बिया काढून टाका. मिरच्यांमध्ये ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या.
मसाले भाजून घ्या
धणे, बडीशेप, जिरे, मोहरी, मेथी दाणे, काळी मिरी आणि ओवा हलके भाजून घ्या. थंड झाल्यानंतर हे मसाले जाडसर वाटून घ्या.
मसाला तयार करा
एका मोठ्या भांड्यात वाटलेले मसाले, मीठ, लाल तिखट, हळद, जिरे, हिंग, काळं मीठ आणि आमचूर पावडर एकत्र मिक्स करा.
मिरच्यांमध्ये मसाला भरा
तयार मसाला लाल मिरच्यांच्या चिरांमध्ये व्यवस्थित भरा. उरलेला मसाला वरूनही घाला.
तेल गरम करा
मोहरीचं तेल धूर येईपर्यंत गरम करा आणि पूर्ण थंड होऊ द्या. हे तेल मिरच्यांवर ओता. सर्व मिरच्या तेलात व्यवस्थित बुडतील याची खात्री करा.
लोणचं मुरू द्या
तयार लोणचं स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीत भरून ४ ते ५ दिवस उन्हात ठेवा. दररोज एकदा हलक्या हाताने मिक्स करा.
टिप्स :
लोणच्यासाठी जाड आणि ताज्या लाल मिरच्या वापरा.
बरणीत ओलावा गेल्यास लोणचं खराब होऊ शकतं, त्यामुळे नेहमी कोरडा चमचा वापरा.
मोहरीचं तेल योग्य प्रमाणात वापरल्यास लोणचं जास्त दिवस टिकतं.
मसाले ताजे भाजून घेतल्यास लोणच्याची चव आणि सुगंध अधिक वाढतो.
उन्हाळ्यात घरच्या घरी बनवा हे झणझणीत राजस्थानी लाल मिरचीचं लोणचं आणि रोजच्या जेवणाची चव आणखी वाढवा.