

भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि संरक्षणाचं प्रतीक म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा होणारा हा सण भावंडांसाठी अत्यंत खास असतो. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचं वचन देतो.
रक्षाबंधनाची तारीख आणि शुभ वेळ
यंदा रक्षाबंधन ९ ऑगस्ट २०२५ रोजी आहे. वैदिक पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ८ ऑगस्टला दुपारी १:२३ वाजता सुरू होऊन ९ ऑगस्टला दुपारी १:२५ वाजेपर्यंत राहील. या वर्षी सणादरम्यान भद्रकाळाचे सावट नाही, त्यामुळे राखी बांधताना कोणताही अडथळा किंवा निषिद्ध वेळ राहणार नाही.
९ ऑगस्ट रोजी सूर्योदय सकाळी ५:४७ वाजता होईल आणि सूर्योदयापासून सुमारे साडेसात तासांचा काळ शुभ मानला जात आहे. यानुसार बहिणी सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्या भावांना निर्विघ्नपणे राखी बांधू शकतात. पौर्णिमा तिथी दुपारी १:२५ वाजेपर्यंत असल्याने सकाळची वेळ विशेष फलदायी ठरणार आहे.
राखी बांधण्याची पद्धत
सणाच्या दिवशी औक्षणाच्या थाळीत अक्षता, कुंकू, दिवा, राखी आणि मिठाई सजवा. भावाच्या कपाळावर टिळक लावून उजव्या मनगटावर राखी बांधा, मिठाई खाऊ घाला आणि औक्षण करा.
यंदाच्या रक्षाबंधनात भद्रकाळाचा अडथळा नसल्याने, योग्य वेळेत राखी बांधून हा पवित्र बंध अधिक दृढ करा.