गणेशोत्सव स्पेशल : उकडीचे मोदक जमत नाहीयेत? तर ट्राय करा रवा-बेसनाचे मोदक, सोपी आणि झटपट रेसिपी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक म्हणजे अगदी आवडीचा पदार्थ. उकडीचे मोदक बनवायला वेळ आणि मेहनत दोन्ही लागते. काहींना उकडीचे मोदक बनवता येत नाही. त्यामुळे अनेक गृहिणी झटपट पण स्वादिष्ट पर्याय शोधतात.
गणेशोत्सव स्पेशल : उकडीचे मोदक जमत नाहीयेत? तर ट्राय करा रवा-बेसनाचे मोदक, सोपी आणि झटपट रेसिपी
Published on

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक म्हणजे अगदी आवडीचा पदार्थ. उकडीचे मोदक बनवायला वेळ आणि मेहनत दोन्ही लागते. काहींना उकडीचे मोदक बनवता येत नाही. त्यामुळे अनेक गृहिणी झटपट पण स्वादिष्ट पर्याय शोधतात. यासाठी रवा आणि बेसनाचे मोदक उत्तम ठरतात. कमी साहित्य, कमी वेळ आणि उत्तम चव - एवढंच या मोदकांचं वैशिष्ट्य आहे. चला तर या गणेशोत्सव निमित्त शिकूया चविष्ट असे रवा आणि बेसनाचे मोदक.

साहित्य

  • १ कप बारीक रवा

  • अर्धा कप बेसन

  • ४ टेबलस्पून तूप

  • १ कप साखर

  • अर्धा कप पाणी

  • अर्धा चमचा वेलचीपूड

  • ड्रायफ्रूट्स (बदाम, काजू आवडीनुसार)

कृती

१. प्रथम रवा मंद आचेवर कोरडा भाजून गुलाबीसर रंग येईपर्यंत हलवत राहा. भाजून झाल्यावर परातीत काढून ठेवा.

२. त्याच कढईत तूप गरम करून बेसन मंद आचेवर खमंग भाजून घ्या. त्यात कापलेले बदाम,काजू घालून छान भाजून घ्या.

३. वेगळ्या पातेल्यात एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक तयार करा. (साखर विरघळून फेस कमी झाला की गॅस बंद करा).

४. हा पाक भाजलेल्या रवा-बेसनाच्या मिश्रणात घालून कालथ्याने ढवळा. भांडं झाकून १५-२० मिनिटं ठेवून द्या.

५. त्यानंतर वेलचीपूड घालून मिश्रण पुन्हा ढवळा. मिश्रण मोदक वळण्याइतपत घट्ट झाले, की मोदकाच्या साच्यात भरून छान मोदक वळा.

खास वैशिष्ट्य

  • हे मोदक ८ ते १० दिवस सहज टिकतात.

  • कमी वेळेत गणपती बाप्पासाठी नैवेद्य तयार करण्याचा हा उत्तम पर्याय.

  • बाजारातून मोदक आणण्यापेक्षा हे पौष्टिक मोदक नक्की ट्राय करा.

logo
marathi.freepressjournal.in