मासिक पाळी ही प्रत्येक वयात आलेल्या महिलेच्या आरोग्याशी निगडित एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे. नियमित पाळी ही हार्मोन्सचे संतुलन आणि प्रजनन आरोग्य व्यवस्थित असल्याचे द्योतक मानली जाते. साधारणपणे २८ ते ३० दिवसांच्या अंतराने पाळी येणे सामान्य असते. मात्र, अनेक महिलांना काही काळाने मासिक पाळी उशिरा येणे किंवा पूर्णपणे चुकण्याचा अनुभव येतो. यामागील कारणे केवळ ताणतणावापुरती मर्यादित नसून शरीरातील हार्मोनल बदल, जीवनशैलीतील असंतुलन आणि आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.
पाहा, कोणत्या कारणांमुळे तुमची पाळी चुकू शकते आणि त्यावर उपाय काय?
१. मानसिक ताणतणाव
दैनंदिन जीवनातील जबाबदाऱ्या, ऑफिसमधील ताण, घरगुती समस्या किंवा भावनिक अस्थिरता या सगळ्याचा परिणाम महिलांच्या शरीरावर थेट होतो. मानसिक ताण वाढल्यास कॉर्टीसॉल (Cortisol) नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो आणि त्यामुळे मेंदूतील हायपोथॅलेमस ग्रंथीवर परिणाम होतो. हीच ग्रंथी पाळीशी संबंधित हार्मोन्स नियंत्रित करते. त्यामुळे तणाव वाढल्यास ओव्ह्युलेशन उशिरा होऊ शकते किंवा थांबूही शकते.
उपाय: ध्यान, योग, श्वसन तंत्र आणि पुरेशी झोप. हे घटक ताण नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
२. पीसीओएस किंवा पीसीओडी
पॉलिसिस्टीक ओव्हरी सिंड्रोम (PCOS) आणि पॉलिसिस्टीक ओव्हरी डिसिज (PCOD) या आजारांमध्ये ओव्हरीजमध्ये छोट्या सिस्ट तयार होतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिन, अँड्रोजन आणि ऑस्ट्रोजेन या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. परिणामतः पाळी अनियमित होते किंवा महिनोंमहिने थांबते.
उपाय: नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेणे गरजेचे आहे.
३. थायरॉईडचे असंतुलन
थायरॉईड ग्रंथी शरीरातील चयापचय (Metabolism) नियंत्रित करते. ‘हायपोथायरॉइडिझम’ (थायरॉईड कमी कार्यरत असणे) किंवा ‘हायपरथायरॉइडिझम’ (थायरॉईड जास्त कार्यरत असणे) या दोन्ही परिस्थितींमध्ये पाळी चुकू शकते. यामुळे शरीरातील ऑस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण बदलते आणि मासिक पाळी अनियमित होते.
उपाय: रक्त तपासणीद्वारे थायरॉईड लेव्हल तपासणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक आहे.
४. अतिव्यायाम किंवा वजनातील झपाट्याने बदल
फिट राहण्याच्या नादात अनेक महिला जास्त व्यायाम करतात किंवा कठोर डाएट घेतात. यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण खूप कमी होते आणि पिट्युटरी ग्रंथी हार्मोनल सिग्नलिंगवर परिणाम करते. परिणामी पाळी उशिरा येते किंवा थांबते.
उपाय: व्यायामाचा समतोल राखा. दररोज ३० ते ४५ मिनिटे चालणे, योग किंवा हलका कार्डिओ पुरेसा आहे.
५. आहारातील बदल आणि पोषणातील कमतरता
अती फायबरयुक्त आहार, अनियमित खाणे, लठ्ठपणा किंवा अत्याधिक बारीक असणे हे सर्व पाळीवर परिणाम करू शकते. शरीरात लोहतत्त्व, व्हिटॅमिन बी१२ आणि फोलेट यांची कमतरता असल्यास हार्मोन्सचे उत्पादन कमी होते.
उपाय: प्रथिनयुक्त आहार, हिरव्या भाज्या, फळे, ड्रायफ्रुट्स आणि पुरेसा पाणीसेवन याकडे लक्ष द्या.
६. गर्भधारणा किंवा स्तनपान
पाळी थांबण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे गर्भधारणा. स्तनपान काळातही शरीरात प्रोलॅक्टिन हार्मोन वाढतो, जो ओव्ह्युलेशन थांबवतो आणि पाळी उशिरा येऊ शकते.
उपाय: पाळी लांबली असेल तर गर्भधारणेची चाचणी करून खात्री करा आणि शंका असल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
मासिक पाळी उशिरा येणे किंवा चुकणे हे नेहमीच गंभीर नसते, पण वारंवार होत असल्यास ते शरीराच्या अंतर्गत असंतुलनाचे लक्षण असू शकते. स्वतःहून औषधे घेणे टाळा. योग्य वेळी वैद्यकीय तपासणी आणि जीवनशैलीतील सुधारणा केल्यास ही समस्या सहज नियंत्रणात येऊ शकते.