

आपल्या सकाळच्या रूटीनची सुरुवात बहुतांश लोक चहानेच करतात. उठल्याबरोबर गरमागरम चहाचा कप हातात आला की दिवसाची सुरुवातच सुखद होते. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, दिवसातून किती वेळा चहा पिणं खरंच योग्य आहे? आणि चुकीच्या वेळी घेतलेला चहा शरीरावर कसा परिणाम करतो? याच प्रश्नाचं सोपं पण महत्त्वाचं उत्तर प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.
ऋजुता दिवेकर यांच्या मते, जर तुम्ही संतुलित जीवनशैली पाळत असाल तर दिवसातून दोन ते तीन कपपेक्षा जास्त चहा घेऊ नये. चहाचे अधिक प्रमाण शरीरातील नैसर्गिक पोषक घटकांचे संतुलन बिघडवू शकते.
अनेक जण सकाळी उठताच चहा घेतात, पण ऋजुता दिवेकरांनी हे टाळण्याचा सल्ला दिला आहे. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडिटी आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी काहीतरी हलकं खाऊन मगच चहा घ्यावा.
चहा पिण्याच्या नादात अनेकजण जेवण टाळतात, पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. दिवेकरांच्या मते, चहामुळे भूक दाबली जाते आणि त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत.
दिवसाच्या शेवटी झोप न येणे हा अनेकांचा त्रास असतो. दिवेकरांच्या म्हणण्यानुसार, दुपारी ४ नंतर चहा किंवा कॉफी घेणं टाळलं पाहिजे, कारण यामुळे झोपेचं चक्र विस्कळीत होतं.
ऋजुता दिवेकरांनी या मुलाखतीत हिमालयातील ८५ वर्षांच्या वृद्ध महिलेची गोष्ट सांगितली. त्या महिलेने विनोदाने सांगितलं होतं की ती दिवसाला ५० कप चहा पिते, तरी तिला कधीच ॲसिडिटी होत नाही! त्यावर ऋजुता म्हणाल्या, "जर तुम्ही त्या बाईसारखे असाल, तर हवे तितके कप चहा घ्या!"