नवरात्री म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उपवासाचा सण. या काळात अनेक जण कांदा-लसूण टाळतात, तर बरेच जण फक्त उपवासाचे पदार्थ खातात. उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वडे, थालिपीठ हे नेहमीचे प्रकार सगळ्यांनाच ठाऊक आहेत. पण आज आपण थोडं वेगळं काहीतरी साबुदाण्याचे पराठे याची माहिती घेणार आहोत. हा पदार्थ चवीला खमंग असून पोटभरीचा असल्याने उपवासात दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवतो.
साहित्य (२ पराठ्यांसाठी)
साबुदाणा - १ कप (४-५ तास भिजवलेला)
उकडलेले बटाटे - २ मध्यम
हिरवी मिरची - २ बारीक चिरलेली
शेंगदाणे कूट - २ टेबलस्पून
कोथिंबीर - १ टेबलस्पून (ऐच्छिक, उपवासात चालत असल्यास)
सैंधव मीठ - चवीनुसार
जिरे - अर्धा टीस्पून
तूप / तेल - पराठा शेकण्यासाठी
कृती
भिजवलेला साबुदाणा मऊ झाल्यावर त्यातील पाणी गाळून घ्या.
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात साबुदाणा, शेंगदाणे कूट, मिरची, जिरे, मीठ आणि कोथिंबीर टाका.
सर्व मिश्रण छान मळून पीठासारखे करून घ्या.
आता छोट्या लिंबाएवढा गोळा घेऊन प्लास्टिक शीटवर किंवा केळीच्या पानावर थोडं तेल लावून पराठा थापून घ्या.
तव्यावर तूप/तेल घालून पराठा दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत शेकून घ्या.
गरमागरम पराठा दही किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
आरोग्यदायी फायदे
साबुदाणा : ऊर्जा देतो, उपवासात शरीराला ताकद मिळते.
शेंगदाणे : प्रथिने आणि चांगले फॅट्स मिळवून देतात.
बटाटा : पोट पटकन भरतो आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्त्रोत आहे.
तूप : पराठ्याला चव आणि पचनास मदत करणारे गुणधर्म देते.
लाइफस्टाईल टिप
नवरात्रीत नेहमी तेच तेच पदार्थ करून कंटाळा येतो. साबुदाण्याचा पराठा हा पारंपरिकतेला आधुनिक ट्विस्ट देतो. हा पराठा केवळ उपवासापुरताच मर्यादित नाही तर हलक्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यातही देता येतो.