
चातुर्मासातील भाद्रपद अमावास्या ही 'सर्वपित्री अमावास्या' म्हणून विशेष मानली जाते. पितृपक्षाचा हा शेवटचा दिवस असून पूर्वजांच्या स्मरण, पिंडदान व तर्पण विधींसाठी याला अत्यंत महत्त्व आहे. यंदा ही अमावास्या अधिक खास मानली जात आहे कारण रविवार, २१ सप्टेंबर रोजी येणाऱ्या या अमावास्येला शुभ योग जुळून आला आहे.
ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर विशेषता
या वर्षीच्या सर्वपित्री अमावास्येला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. मात्र, हे ग्रहण रात्री लागणार असल्याने ते भारतातून दिसणार नाही. तरीदेखील या दिवशी ग्रहणाचा विशेष आध्यात्मिक परिणाम होणार असल्याचे मानले जाते.
तिथी व कालावधी
सर्वपित्री अमावास्या तिथीचा प्रारंभ शनिवार, २० सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ वा. होणार असून, समाप्ती रविवार, २१ सप्टेंबर रोजी रात्री १.२४ वा. होईल. सूर्योदयावर आधारित परंपरेनुसार ही अमावास्या रविवार, २१ सप्टेंबर रोजी मानली जाणार आहे.
सर्वपित्री अमावास्येचे महत्त्व
पितृपक्षातील अखेरचा दिवस असल्याने या दिवशी केलेले श्राद्ध कार्य व तर्पण विधी सर्वाधिक फलदायी मानले जातात. शास्त्रांनुसार, पूर्वजांना प्रसन्न करून त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबावर सुख-समृद्धी लाभते.
एका व्यक्तीने श्राद्ध केल्यास सात पिढ्यांचा उद्धार होतो, असे मानले जाते.
श्राद्ध केवळ आपल्या आई-वडिलांसाठीच नव्हे तर आजोबा, पणजोबा, आईची आई, तसेच वारस नसलेले, उपकारकर्ते, मित्र, अगदी स्मरण करणारा कोणी नसलेले लोक यांच्यासाठीही केले जाते.
ज्यांनी वर्षभर पितरांसाठी काही केले नाही, त्यांनी केवळ या दिवशी श्राद्ध केल्यास पूर्वज तृप्त होतात, असे मानले जाते.
श्राद्ध तर्पण विधी कसा करावा?
सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करताना पाण्यात गंगाजल मिसळावे. स्वच्छ वस्त्रे परिधान करून सात्विक आहार घ्यावा.
घराच्या प्रवेशद्वारावर व देवासमोर दिवा लावावा.
कलशात पाणी घेऊन प्रार्थना करावी.
पूर्वजांचे मनापासून स्मरण करून त्यांच्या कृपादृष्टीची याचना करावी.
दिवसभर सात्त्विकता जपावी आणि मनापासून क्षमा मागावी.
आध्यात्मिक दृष्टिकोन
भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की “सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे”. त्यामुळे आर्यमा देवाचे स्मरण करून या दिवशी श्राद्ध केले तर त्याचे पुण्य अनेक पटीने वाढते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे.
सर्वपित्री अमावास्या हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठीचा सुवर्णसंधीचा दिवस आहे. या दिवशी पिंडदान, तर्पण, श्राद्ध यांसारखे कर्मकांड श्रद्धेने व प्रामाणिकपणे केले, तर ते केवळ पितरांना तृप्त करणारे ठरत नाही, तर कुटुंबासाठीही सौख्य आणि शांती घडवणारे ठरते.
(Disclaimer: हा लेख इंटरनेटवर उपलब्ध माहितीवर आधारित आहे. याची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)