

श्रावण महिना सुरू झाला की उपवासाच्या पदार्थांची यादीही मोठी होते. पण रोज साबुदाणा खिचडी, थालीपीठ किंवा बटाट्याचा फराळ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी उपवासात मधल्या वेळेला किंवा चहासोबत काहीतरी कुरकुरीत आणि चटकदार खायचं असेल, तर घरच्या घरी तयार केलेला फराळी चिवडा एकदम उत्तम पर्याय ठरू शकतो. बटाटा, साबुदाणा, मखाणे, शेंगदाणे आणि ड्रायफ्रूट्सपासून तयार होणारा हा चिवडा कमी वेळात बनतो आणि काही दिवस हवाबंद डब्यातही ठेवता येतो.
साहित्य
नायलॉन साबुदाणा - २ कप
मखाणे - १ कप
साजूक तूप किंवा तेल - १ कप
शेंगदाणे - १ कप
बदाम - १० ते १२
काजू - १० ते १२
कच्च्या बटाट्याचा किस - १ कप
हिरव्या मिरच्या - ४ ते ५
कडीपत्ता - १० ते २० पाने
सैंधव मीठ - चवीनुसार
जिरेपूड - अर्धा टेबलस्पून
आमचूर पावडर - अर्धा टेबलस्पून
पिठीसाखर - अर्धा टेबलस्पून
कृती
सगळ्यात आधी बटाट्याचा किस तळून घ्या -
बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्याचे अगदी बारीक आणि पातळ काप करून त्याचा किस तयार करा. हा किस २-३ वेळा पाण्याने धुवून घ्या आणि कापडावर पसरून पूर्णपणे कोरडा करा. बटाट्यात पाणी राहिलं तर तळताना तेल उडू शकतं आणि किस कुरकुरीत होणार नाही.
तेल गरम करून त्यात बटाट्याचा किस सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्या.
साबुदाणा आणि मखाण्याची तयारी -
नायलॉन साबुदाण्यावर अगदी थोडंसं पाणी शिंपडा. तो १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. त्यानंतर गरम तेलात साबुदाणा तडतडेपर्यंत तळून घ्या.
दुसऱ्या कढईत मखाणे तेल न घालता हलके भाजून घ्या. ते कुरकुरीत झाले की बाजूला काढा.
शेंगदाणे, काजू-बदामही तळून घ्या -
आता त्याच तेलात शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, काजू, बदाम आणि कडीपत्ता तळून घ्या. हे सगळे पदार्थ खरपूस झाले की गॅस बंद करा.
सगळे जिन्नस एकत्र करा -
एका मोठ्या भांड्यात तळलेला बटाट्याचा किस, साबुदाणा आणि भाजलेले मखाणे घ्या. त्यात तळलेले शेंगदाणे, काजू-बदाम, हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता घाला.
आता त्यावर सैंधव मीठ, जिरेपूड, आमचूर पावडर आणि पिठीसाखर भुरभुरवा. सगळं मिश्रण हलक्या हाताने एकत्र करा, म्हणजे साबुदाणा आणि बटाट्याचे कुरकुरीत तुकडे तुटणार नाहीत.
कुरकुरीत फराळी चिवडा तयार!
तयार झालेला चिवडा पूर्णपणे थंड होऊ द्या आणि त्यानंतर हवाबंद डब्यात भरून ठेवा. उपवासाच्या वेळी भूक लागली किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत खावंसं वाटलं, तर हा फराळी चिवडा लगेच खाता येईल.