

आजच्या धावपळीच्या जीवनात शरीराला योग्य पोषण मिळणं तितकंच महत्त्वाचं बनलं आहे. सततचा थकवा, पचनाच्या समस्या, अशक्तपणा आणि हाडांची कमजोरी अशा अनेक तक्रारी हल्ली कमी वयातही दिसू लागल्या आहेत. अशा वेळी रोजच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहण्यास मदत होते. त्यापैकीच एक असरदार ड्रायफ्रूट म्हणजे अंजीर.
अंजीर हे केवळ चवीपुरतंच मर्यादित नसून, त्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. विशेषतः अंजीर भिजवून खाल्ल्यास त्यातील पोषणमूल्ये अधिक चांगल्या प्रकारे शरीराला मिळतात. त्यामुळे अनेक आहारतज्ज्ञ सकाळी उपाशीपोटी भिजवलेलं अंजीर खाण्याचा सल्ला देतात.
पचनसंस्था सुधारण्यास मदत
रोज रात्री १ ते २ अंजीर पाण्यात भिजवून सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास पोट साफ होण्यास मदत होते. अंजीरामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होऊ शकते. पचनक्रिया सुरळीत राहिल्याने शरीर हलकं वाटतं.
शरीराला मिळते नैसर्गिक ऊर्जा
अंजीर आणि बेदाणे एकत्र दुधात भिजवून खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळण्यास मदत होते. यासाठी दोन अंजीरांचे छोटे तुकडे करून त्यात ५ ते ६ बेदाणे घालावेत. हे मिश्रण एका ग्लास दुधात रात्रभर भिजवून सकाळी कोमट करून प्यावं. यामुळे अशक्तपणा आणि थकवा कमी होण्यास मदत मिळू शकते.
हाडांसाठी फायदेशीर
अंजीरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतं. हे दोन्ही घटक हाडं मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. वाढत्या वयात हाडांची झीज कमी करण्यासाठी आणि शरीराला बळकटी देण्यासाठी भिजवलेलं अंजीर उपयुक्त ठरू शकतं.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
नियमित अंजीर खाल्ल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. बदलत्या हवामानात वारंवार होणारे संसर्ग आणि कमजोरीपासून शरीराचं संरक्षण करण्यासाठी अंजीर फायदेशीर मानलं जातं.
अंजीर खाताना या गोष्टी लक्षात ठेवा
अंजीर प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. अतिप्रमाणात सेवन केल्यास काहींना पचनाचा त्रास होऊ शकतो. मधुमेह किंवा इतर आरोग्याच्या तक्रारी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत.