
पिवळसर छटा, मनमोहक दरवळ आणि देवळाच्या गाभाऱ्यातून बाहेर येणारा सोनचाफ्याचा सुवास… हे फूल पाहताक्षणीच मन शांत होतं. स्त्रियांच्या आवडीच्या फुलांमध्ये याचं एक खास स्थान आहे. सोनचाफा केवळ केसात माळण्यासाठी वा देवघरात पूजनासाठी नाही, तर त्याच्या औषधी गुणधर्मांमुळेही आयुर्वेदात 'सुवर्णचंपक' किंवा 'हेमपुष्प' म्हणून गौरवले जाते.
त्याचा सुंदर रंग, मंद गंध, औषधी गुणधर्म आणि अध्यात्मिक पवित्रता यांचा सुरेख मिलाफ अनुभवता येते. एकाच झाडातून सौंदर्य, औषधोपचार आणि व्यावसायिक उपयोग मिळतो हेच सोनचाफ्याचं खास वैशिष्ट्य आहे.
नैसर्गिक रंगाचा उपयोग -
सोनचाफ्याच्या फुलांपासून मिळणारा नैसर्गिक रंग कापड उद्योगात वापरला जातो. पारंपरिक रंगकामामध्ये याचा उपयोग पर्यावरणपूरक पर्याय म्हणून होतो, त्यामुळे त्याचे आर्थिक व व्यावसायिक महत्त्वही वाढले आहे.
औषधी उपयोग - निसर्गसंपदेतून आरोग्य
सुगंध आणि मानसिक शांतता -
सोनचाफ्याच्या फुलांचा मंद सुगंध तणाव, चिंता आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. सुगंधोपचार (Aromatherapy) मध्ये याचा वापर मन शांत करण्यासाठी आणि झोपेसाठी केला जातो.
त्वचेच्या समस्यांवर उपयोगी -
फुलांपासून मिळणारं चंपा तेल अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी असतं. त्यामुळे पुरळ, डाग, खाज, सौम्य संसर्ग यावर वापरल्यास त्वचेला आराम मिळतो.
डोकदुखीवर आराम -
डोकेदुखीवेळी चंपा तेल कपाळावर चोळल्यास त्वरित आराम मिळतो. याचा सुगंध मस्तिष्काला शांत करणारा परिणाम देतो.
पचन व उत्सर्जन क्रियेसाठी उपयुक्त -
फुलं व पानं पचन सुधारण्यासाठी आयुर्वेदात वापरली जातात. अपचन, गॅसेस, अन्न न पचणे यावर याचा उपयोग होतो. यातील घटक रेचक व मूत्रल म्हणूनही काम करतात.
श्वसन मार्गासाठी उपयोगी -
सोनचाफ्याचे अर्क कफोत्सारक असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, घशातील जळजळ यावर उपयोग होतो. छातीत साचलेला कफ बाहेर टाकण्यात मदत होते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी -
फुलांचा अर्क डोळ्यांना थंडावा देण्यासाठी वापरला जातो. डोळ्यांची जळजळ, थकवा, लालसरपणा यावर आराम मिळतो. (वैद्यकीय सल्ल्यानंतर वापरावा.)
औषधी वापर करताना काळजी -
सोनचाफ्याचे फुलं, पानं, साल वा तेल औषधी उपयोगासाठी वापरण्यापूर्वी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक घटक लाभदायक असले तरी, प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्यामुळे काहींना गैर परिणाम होऊ शकतो.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)