रोज सकाळी पोहे, शिरा, उपमा यासारखा टिपिकल नाश्ता खाऊन तुम्हालाही कंटाळा आला आहे ना? मग या रोजच्या कंटाळवाण्या नाश्त्याला करा Bye Bye! आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत झटपट, पौष्टिक आणि चविष्ट सोयाबीन टिक्की, सकाळच्या नाश्त्यासाठी एकदम पर्फेक्ट पर्याय! घरच्या घरी बनवलेली, जास्त तेलाशिवाय तयार होणारी ही टिक्की पोट दीर्घकाळ भरते आणि दिवसाची ऊर्जा देते.
साहित्य:
सोयाबीन - १ कप
कांदा - १ मध्यम, बारीक चिरलेला
गाजर - १, किसलेली
लाल तिखट - १/२ टीस्पून
कोथिंबीर - २ टीस्पून, बारीक चिरलेली
मीठ - चवीनुसार
आलं-लसूण पेस्ट - १ टीस्पून
बेसन - १ चमचा
गरम मसाला - १/४ टीस्पून
तेल - भाजण्यासाठी
सोयाबीन टिक्की बनवण्यासाठी प्रथम सोयाबीन थोड्या पाण्यात १५–२० मिनिटे भिजवून ठेवा. भिजलेली सोयाबीन मिक्सरमध्ये जाडसर बारीक वाटून घ्या, त्यामुळे टिक्कीला सुंदर चव आणि घट्टपणा येतो. मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, किसलेली गाजर, बेसन, आलं-लसूण पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट मिक्स करा. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे टिक्की रूपात बनवा आणि तव्यावर तेल गरम करून दोन्ही बाजूंनी सोनेरी भाजून घ्या. झटपट, पौष्टिक आणि स्वादिष्ट सोयाबीन टिक्की तयार आहे!
सोयाबीन जास्त पाणी टाळून बारीक वाटा, नाहीतर मिश्रण पातळ होईल.
टिक्की फार मोठ्या न करता मध्यम आकारात करा, आतून नीट भाजली जातील.
क्रिस्पी हवी असल्यास, बाहेरून हलक्या हाताने बेसन शिंपडा.
सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह केल्यास चव अजून खुलते.