जास्त तणावामुळे वाढतोय केस गळतीचा धोका; जाणून घ्या कारणं आणि उपाय

सध्या अनेकजण धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तीव्र मानसिक दबावाखाली जगत आहेत. या वाढलेल्या स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्यच नव्हे तर केसांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
जास्त तणावामुळे वाढतोय केस गळतीचा धोका; जाणून घ्या कारणं आणि उपाय
Published on

सध्या अनेकजण धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे तीव्र मानसिक दबावाखाली जगत आहेत. या वाढलेल्या स्ट्रेसमुळे केवळ मानसिक आरोग्यच नव्हे तर केसांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो. शरीरातील कोर्टिसोल नावाच्या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढल्यामुळे, केस गळणे, पातळ होणे आणि अकाली पांढरे होणे अशा समस्या उद्भवतात.

स्ट्रेसमुळे होणाऱ्या केसांच्या समस्या

१. टेलोजेन एफ्लुवियम (Telogen Effluvium) - हे केस गळण्याचं एक तात्पुरतं कारण असून, जास्त स्ट्रेसमुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढीची प्रक्रिया थांबते. यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर केस गळू लागतात. विशेषतः केस विंचरताना किंवा झोपेच्या वेळी उशावर केस आढळतात.

२. अकाली केस पांढरे होणे - NIH च्या (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ) अभ्यासानुसार, स्ट्रेसमुळे मेलानोसाइट्स (जे केसांचा रंग नियंत्रित करतात) यांच्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे केस लवकर पांढरे होण्याची शक्यता वाढते.

३. केस पातळ होणे आणि कमकुवत होणे - दीर्घकाळ स्ट्रेसमध्ये राहिल्यास केसांच्या मुळांना योग्य पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे केस पातळ, कमजोर होतात आणि पटकन तुटतात.

४. मुळांपासून केस कमजोर होणे - स्ट्रेसमुळे रक्ताभिसरण कमी होतं आणि हार्मोन्स असंतुलित होतात. यामुळे केसांची मुळे कमजोर होतात आणि टेक्स्चर खराब होतो.

५. अ‍ॅलोपेसिया एरीटा (Alopecia Areata) - ही एक ऑटो-इम्यून समस्या असून, ती स्ट्रेसमुळे उद्भवते. यात शरीराची प्रतिकारशक्ती स्वतःच्याच केसांच्या मुळांवर हल्ला करते आणि थोड्याच दिवसांत केस गळायला लागतात.

केस गळतीपासून वाचण्यासाठी काय करावे?

१. स्ट्रेस कमी करा - योग, ध्यानधारणा, श्वसनाचे व्यायाम, चालणे किंवा धावणे यामुळे मन शांत होते.

२. संतुलित आहार घ्या - हिरव्या पालेभाज्या, अन्नातील व्हिटॅमिन B, C, E, ब्रोकली, फळे इत्यादी आहारात समाविष्ट करा.

३. पुरेशी झोप घ्या - झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि केस गळती वाढते.

४. स्काल्पची योग्य काळजी घ्या - नियमित तेल लावा, स्वच्छता ठेवा, ब्लड सर्कुलेशन वाढवा.

५. डॉक्टरांचा सल्ला घ्या - समस्या गंभीर वाटल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

जास्त तणाव तुमच्या केसांवर परिणाम करू शकतो. म्हणूनच तणावावर नियंत्रण, योग्य आहार, आणि नियमित काळजी ही केसांचे आरोग्य राखण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

logo
marathi.freepressjournal.in