

उन्हाळ्याच्या कडक उष्णतेत शरीर थंड ठेवण्यासाठी अनेकजण थंड पेये, आईस्क्रीम किंवा साखरयुक्त पदार्थांकडे वळतात. मात्र, हे पदार्थ केवळ तोंडाला थंडावा देतात, शरीराला नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत तज्ज्ञांनी सांगितले की, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी योग्य हायड्रेशन, इलेक्ट्रोलाइट्स आणि पचनाला मदत करणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. हे पदार्थ त्वचा, केस, पचनसंस्था आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी फायदेशीर ठरू शकतात.
१. काकडी
काकडीमध्ये सुमारे ९५ टक्के पाणी असते, त्यामुळे ती शरीराला नैसर्गिक थंडावा आणि हायड्रेशन देते. कमी कॅलरी आणि सूक्ष्म पोषकतत्त्वांनी युक्त असलेली काकडी पचनासाठी हलकी मानली जाते.
तज्ज्ञांचे मते, काकडी शरीरातील उष्णता कमी करण्यास, डिहायड्रेशन टाळण्यास आणि कोलेजन निर्मितीस मदत करते. काकडी मीठ घालून, सॅलडमध्ये किंवा दह्यासोबत खाणे उपयुक्त ठरू शकते.
२. नारळपाणी
नारळपाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स, पोटॅशियम आणि सोडियमने समृद्ध पेय आहे. शरीरातील द्रव संतुलन राखण्यासाठी ते उपयुक्त मानले जाते.
तज्ज्ञांचे मते, पॅकबंद स्पोर्ट्स ड्रिंक्सपेक्षा नारळपाणी अधिक फायदेशीर ठरते. त्यात चिमूटभर सैंधव मीठ आणि थोडासा लिंबाचा रस मिसळल्यास ते अधिक पौष्टिक बनते.
३. टरबूज
उन्हाळ्यात टरबूज हा सर्वाधिक लोकप्रिय फळांपैकी एक आहे. यात सुमारे ९० टक्के पाणी असते. तसेच, लाइकोपीन नावाचे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात.
टरबूज शरीराला नैसर्गिक थंडावा देते आणि जड जेवणानंतर हलका स्नॅक म्हणून खाता येते.
४. दही
दही किंवा योगर्ट पचनसंस्थेसाठी फायदेशीर असून शरीराला थंडावा देण्यास मदत करते. यात प्रोबायोटिक्स असल्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
दही साधे, ताकाच्या स्वरूपात किंवा इतर पदार्थांमध्ये वापरून सेवन करता येते.
५. पुदिना
पुदिन्यामध्ये मेंथॉल असल्यामुळे शरीराला नैसर्गिक थंडावा जाणवतो. तसेच पचन सुधारण्यास आणि उष्णतेमुळे होणारा त्रास कमी करण्यास मदत होते.
पुदिना चटणी, फ्लेवर्ड पाणी किंवा चहामध्ये वापरता येतो.
माठातील पाणीही फायदेशीर
तज्ज्ञांनी माठातील पाणी पिण्याचाही सल्ला दिला आहे. मातीच्या भांड्यातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि किंचित अल्कलाइन गुणधर्म असतात.
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी योग्य पर्याय
तज्ज्ञांच्या मते, हे पदार्थ शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवतात, इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करतात आणि पचन सुधारतात. त्यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णता कमी होण्यास मदत होते.