वृंदेने भगवान विष्णूला दिलेल्या शापातून सुरू झाला 'तुळशी विवाह'; जाणून घ्या परंपरा आणि पौराणिक कथा

दिवाळीनंतर घराघरांत लग्नाचे मंगलध्वनी घुमू लागतात. कारण, दिवाळी संपली की तुळशीच्या लग्नाने घरातील विवाहाचे वेध सुरू होतात. प्रकाशाच्या उत्सवानंतर भक्तिभाव, श्रद्धा आणि परंपरेचा संगम साधणारा तुळशी विवाह हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र सोहळा मानला जातो.
वृंदेने भगवान विष्णूला दिलेल्या शापातून सुरू झाला 'तुळशी विवाह'; जाणून घ्या परंपरा आणि पौराणिक कथा
Published on

दिवाळीनंतर घराघरांत लग्नाचे मंगलध्वनी घुमू लागतात. कारण, दिवाळी संपली की तुळशीच्या लग्नाने घरातील विवाहाचे वेध सुरू होतात. प्रकाशाच्या उत्सवानंतर भक्तिभाव, श्रद्धा आणि परंपरेचा संगम साधणारा तुळशी विवाह हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत पवित्र सोहळा मानला जातो. या वर्षी तुळशी विवाहाचा शुभारंभ २ नोव्हेंबर २०२५ रोजी होत असून, कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा पारंपरिक विधी साजरा केला जाणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला शुभकार्यांची सुरुवात करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते, अशी जनश्रद्धा आहे.

तुळशी विवाहाच्या एक दिवस आधीच प्रत्येक घरात तयारीचा उत्साह दिसू लागतो. अंगणातील तुळशीवृंदावन स्वच्छ करून रंगवले जाते, झेंडूच्या फुलांनी आणि ऊस, चिंच, आवळ्यांनी सजवले जाते. काही घरांत तुळशीला नवरीप्रमाणे साडी, चोळी, दागिने, नथ व मंगळसूत्र परिधान केले जाते. फ्लॅट संस्कृती वाढली असली तरी, बाल्कनीत तुळशीला दिलेली छोटीशी जागा या पारंपरिक सोहळ्याला अधिक जिव्हाळ्याची बनवते. रांगोळ्यांनी सजलेले वृंदावन, दीपांच्या लुकलुकत्या प्रकाशात सजणारी तुळस आणि घराघरात उमटणारा मंत्रोच्चार... या सगळ्यानेच भक्तिभावाचे वातावरण भारून जाते.

तुळशी विवाहामागची पौराणिक कथा

तुळशी विवाह हा भगवान विष्णू (शाळीग्राम) आणि तुळस देवी (लक्ष्मीचे रूप) यांचा पवित्र मिलन सोहळा आहे. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी हा विवाह केला जातो आणि यानंतरच सर्व शुभकार्यांची जसे की विवाह, मुंज, गृहप्रवेश सुरुवात करण्याची परंपरा आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशी विवाहाची कथा सांगितली आहे. पूर्वी पृथ्वीवर वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती. ती दैत्यराज जळंधरची पत्नी होती. तिच्या पतिव्रत धर्मामुळे जळंधराला देवतासुद्धा जिंकता येत नव्हत्या. देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जळंधराचे रूप धारण केले आणि वृंदेसमोर आले. वृंदा पतीच्या रूपातील विष्णूंना ओळखू शकली नाही आणि त्यामुळे तिच्या पतिव्रताचे बळ नष्ट झाले. त्या क्षणी खऱ्या जळंधराचा वध झाला. ही गोष्ट कळल्यावर वृंदेला प्रचंड संताप आला. तिने भगवान विष्णूंना शाप दिला. “तूही माझ्यासारखाच पाषाणस्वरूप होशील.” वृंदेच्या शापाने विष्णूंनी शाळीग्राम रूप धारण केले. वृंदा त्या घटनेने दु:खी होऊन स्वतःला अग्नीत झोकून दिले. तिच्या राखेतून तुळशीचे रोपटे उगवले. भगवान विष्णूंनी तिची क्षमा मागून तिला वचन दिले, “हे तुळस, पृथ्वीवर तुझी पूजा माझ्या पूजेविना होणार नाही. प्रत्येक वर्षी मी तुला वधू मानून विवाह करीन.” तेव्हापासून तुळशी आणि शाळीग्रामाचा विवाह म्हणजेच तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा सुरू झाली.

हा सण केवळ धार्मिक नाही, तर भक्ती, नात्यांतील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे. तुळस ही शुद्धता, श्रद्धा आणि स्त्रीशक्तीचे प्रतीक मानली जाते, तर शाळीग्राम म्हणजे स्थैर्य आणि संरक्षणाचे. या दोघांच्या मिलनातूनच जीवनातील संतुलनाचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा संदेश दिला जातो.

logo
marathi.freepressjournal.in