Folic Acid : फॉलिक ऍसिडची कमतरता शरीरासाठी धोकादायक; जाणून घ्या लक्षणे, फायदे आणि नैसर्गिक स्रोत

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फॉलिक ऍसिड, म्हणजेच व्हिटॅमिन बी९, हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. आधुनिक जीवनशैली, चुकीचे आहारपद्धती आणि वाढता ताण यामुळे अनेकजण फॉलिक ऍसिडच्या कमतरतेचा सामना करत आहेत.
Photo - Canva
Photo - Canva
Published on

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फॉलिक ऍसिड, म्हणजेच व्हिटॅमिन बी९, हे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. आधुनिक जीवनशैली, चुकीचे आहारपद्धती आणि वाढता ताण यामुळे अनेकजण फॉलिक ऍसिडच्या कमतरतेचा सामना करत आहेत. पण याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आपण गांभीर्याने घेत नाही. फॉलिक ऍसिड हे शरीराच्या पेशींच्या वाढीसाठी, नवीन पेशी तयार करण्यासाठी आणि डीएनए-आरएनए तयार होण्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे याचे प्रमाण शरीरात संतुलित असणे अत्यावश्यक आहे.

विशेषतः गरोदरपणात बाळाच्या आरोग्यासाठी, केसांच्या सौंदर्यासाठी, पुरुषांच्या प्रजनन क्षमतेसाठी आणि काही गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी फॉलिक ऍसिड हे उपयुक्त ठरते. आज आपण जाणून घेणार आहोत की, त्याची शरीरासाठी गरज का आहे, त्याच्या कमतरतेची लक्षणं कोणती, आणि नैसर्गिकरित्या फॉलिक ऍसिड मिळवण्यासाठी कोणते पदार्थ आहारात समाविष्ट करावेत.

फॉलिक ऍसिडचे फायदे काय आहेत?

केस गळती रोखते - फॉलिक ऍसिड हे केसांचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्याचा नियमित समावेश आहारात केल्यास केस गळती नियंत्रणात राहते.

गर्भधारणेसाठी उपयुक्त - गरोदरपणात बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कण्याच्या योग्य विकासासाठी फॉलिक ऍसिड अत्यावश्यक असते.

पुरुषांमध्ये वंध्यत्वावर उपाय - पुरुषांच्या प्रजनन क्षमतेत सुधारणा करण्यासाठी फॉलिक ऍसिडचा उपयोग होतो.

तणाव कमी करतो - जीवनातील मानसिक ताण आणि थकवा कमी करण्यासाठी फॉलिक ऍसिड फायदेशीर ठरते.

कर्करोगापासून संरक्षण - फॉलिक ऍसिडच्या योग्य प्रमाणात सेवनामुळे काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो, असे संशोधनातून समोर आले आहे.

फॉलिक ऍसिडचे नैसर्गिक स्रोत कोणते?

अंडी, अ‍ॅव्होकाडो, बदाम, शतावरी, ब्रोकोली, वाटाणे, राजमा, केळी, टोमॅटो आणि सोयाबीन हे पदार्थ फॉलिक ऍसिडने परिपूर्ण आहेत.

फॉलिक ऍसिडच्या कमतरतेची लक्षणे

  • शारीरिक विकासात अडथळा

  • केस वेळेपूर्वी पांढरे होणे

  • तोंडात किंवा जीभेवर अल्सर

  • पचनासंबंधी समस्या जसे की अतिसार

  • थकवा, चिडचिड आणि भूक न लागणे

विशेषतः गरोदर स्त्रिया, लहान मुले आणि प्रजननक्षम पुरुष यांनी आपल्या आहारात फॉलिक ऍसिडचा समावेश करण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पूरक फॉलिक ऍसिड घेणेही उपयुक्त ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in