सोशल मीडियावर आरोग्यविषयक अनेक उपाय आणि दावे दररोज व्हायरल होत असतात. त्यापैकी काही माहिती उपयुक्त असली, तरी अनेक दावे दिशाभूल करणारेही ठरतात. सध्या "उन्हात ठेवलेलं पाणी पिल्याने शरीराला व्हिटामिन D मिळतं" असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. पण खरंच असं होतं का? याबाबत डॉक्टरांनी खुलासा केला आहे.
काय आहे व्हायरल दावा?
व्हिडिओमध्ये महिला सांगत आहे की, एका काचेच्या बाटलीत पाणी भरून, बाटली थोडी रिकामी ठेवून ती उन्हात ठेवावी. त्यानंतर ते पाणी पिल्यास शरीराला व्हिटामिन D मिळतं.
डॉक्टर काय सांगतात?
डॉ. बृजपाल त्यागी यांनी स्पष्ट केलं आहे की, "उन्हात ठेवलेलं पाणी पिल्याने व्हिटामिन D मिळतं, याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही." त्यांनी लोकांना अशा भ्रामक दाव्यांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
शरीरात व्हिटामिन D कसं तयार होतं?
व्हिटामिन D शरीरात नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार होतं. जेव्हा आपल्या त्वचेचा काही भाग थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो, तेव्हा सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा त्वचेवर परिणाम होतो. त्वचेमध्ये असलेल्या विशिष्ट रसायनांशी या किरणांची रिॲक्शन होऊन व्हिटामिन D3 तयार होतं.
हे व्हिटामिन नंतर लिव्हर आणि किडनीमधून सक्रिय होतं आणि शरीरातील कॅल्शियम शोषण, हाडांची मजबुती यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
कपडे घालून उन्हात बसलात तर फायदा होतो का?
डॉक्टरांच्या मते, शरीर पूर्णपणे कपड्यांनी झाकलेलं असल्यास सूर्यकिरण त्वचेपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे थेट त्वचेवर सूर्यप्रकाश येणं आवश्यक आहे. साधारण २० ते ३० मिनिटं रोज सूर्यप्रकाशात बसणं उपयुक्त ठरू शकतं.
उन्हात ठेवलेलं पाणी पिल्याने व्हिटामिन D मिळतं हा दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिटामिन D मिळवण्यासाठी थेट सूर्यप्रकाश हा योग्य मार्ग आहे. आवश्यक असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट्स घेणं हा पर्याय असू शकतो.
सोशल मीडियावरील कोणताही आरोग्यविषयक सल्ला आंधळेपणाने फॉलो करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरतं.