एक डुलकी तर दुपारी घ्यायलाच हवी! मेंदू होईल ताजातवाना, जाणून घ्या वामकुक्षीचे फायदे

जीवनशैलीतील एक छोटा बदल तुम्हाला या सर्व समस्यांमधून मुक्ती देऊ शकतो. तो म्हणजे दुपारी जेवल्यानंतर घेतलेली छान झोप. जाणून घेऊ वामकुक्षी म्हणजे काय आणि त्याचे फायदे...
एक डुलकी तर दुपारी घ्यायलाच हवी! मेंदू होईल ताजातवाना, जाणून घ्या वामकुक्षीचे फायदे
Freepik
Published on

आजकालच्या डिजिटल आणि धावपळीच्या युगात लोक आपल्या पारंपारिक आरोग्यदायी जीवनशैलीला विसरत चालले आहे. परिणामी मानसिक ताण, शारीरिक थकवा, डोळ्यांवरील ताण, कार्य मंदगतीने होणे असे कितीतरी दुष्परिणाम वाढत आहे. मात्र, जीवनशैलीतील एक छोटा बदल तुम्हाला या सर्व समस्यांमधून मुक्ती देऊ शकतो. तो म्हणजे दुपारी जेवल्यानंतर घेतलेली छान झोप. जाणून घेऊ वामकुक्षी म्हणजे काय आणि त्याचे फायदे...

वामकुक्षी म्हणजे काय?

सामान्यपणे दुपारी जेवण केल्यानंतर थोड्यावेळाने घेतलेली एक निवांत झोप किंवा विश्रांती म्हणजे वामकुक्षी होय. मात्र, वामकुक्षी घेण्याचेही काही नियम आहेत. तरच याचे आरोग्याला फायदे मिळतात.

वामकुक्षी घेण्याचे नियम काय आहेत?

सामान्यपणे सकाळी लवकर उठून आपली दैनंदिन कार्ये लवकर सुरू करून दुपारी एक वाजेपर्यंत जेवण करून घ्यावे. त्यानंतर अर्धा तासाने वामकुक्षी घ्यावी. वामकुक्षी ही अर्धा तासापेक्षा जास्त नसावी.

वामकुक्षी घेण्याची योग्य पद्धत

दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासाने डाव्या कुशीवर निवांत झोपावे. सामान्यपणे २० मिनिटांची गुणवत्तापूर्ण झोप असावी. कोणताही व्यत्यय त्यात नसावा. जास्तीत जास्त अर्धा तास झोप घ्यावी.

कार्यस्थळी सुद्धा घेऊ शकता वामकुक्षी

तुम्ही कार्यस्थळी असाल तर रिलॅक्स खुर्चीवर वामकुक्षी घेऊ शकता. वामकुक्षी घेण्याआधी डोळ्यावर पट्टी लावून घ्यावी. म्हणजे झोपेत अडथळा येणार नाही आणि झोप शांत होईल.

वामकुक्षीचे फायदे

शारीरिक आणि मानसिक थकवा जातो

दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ झोपल्याने तुमचा दिवसभरातील श्रमाचा थकवा निघून जातो. हा थकवा शारीरिकच नाही तर मानसिक थकवा देखील दूर होतो.

मेंदुला चालना मिळते

मेंदुला विश्रांती मिळाल्याने मेंदू ताजातवाना होवून पुन्हा कामाला लागतो. यावेळी मेंदू विश्रांती मिळाल्याने अधिक चांगल्याप्रकारे सक्रिय होतो.

स्मरण शक्ती वाढते

मेंदुला विश्रांती मिळाल्याने दिवसभरात केलेल्या कार्याचे ठसे मेंदूवर पक्के होतात. त्यामुळे स्मरण शक्ती वाढते.

एकाग्रता वाढते

योग्य वेळी मेंदुला विश्रांती मिळाल्याने पुन्हा नवीन काम करताना अधिक चांगल्याप्रकारे काम करता येऊ शकते. कामात एकाग्रता वाढते.

नकारात्मक विचार दूर होतात

कामाच्या वेळी अनेक वेळा आपल्या अवती भवती नकारात्मक घटना घडतात. त्याचा परिणाम मनावर झालेला असतो. मात्र दुपारच्या जेवणानंतर झोप घेतल्याने मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि सकारात्मकता वाढीस लागते.

डिजिटल आयस्ट्रेन रोखण्यास मदत

हल्ली आपण सातत्याने स्क्रीनसमोर असतो. त्यामुळे डिजिटल आयस्ट्रेन होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुपारी झोप घेतल्याने तेवढा वेळ तुम्ही स्क्रीनपासून लांब राहता. त्यामुळे डोळ्यांवर आलेला थकवा दूर होतो. परिणामी डिजिटल आयस्ट्रेन रोखण्यास मदत होते.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in