गर्भावस्थेत अनेक स्त्रियांना का होते लोहाची कमतरता? पोषणतज्ज्ञ सांगतात; ‘गर्भधारणेनंतर लोह पातळी वाढवणं जवळपास अशक्य…

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मोनिका अण्णा यांनी हे स्पष्ट करताना सांगितलं की, गर्भधारणेनंतर लोहाची पातळी वाढवणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळेच गर्भधारणेपूर्वीच लोहसाठा (फेरिटिन) चांगला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
गर्भावस्थेत अनेक स्त्रियांना का होते लोहाची कमतरता?
गर्भावस्थेत अनेक स्त्रियांना का होते लोहाची कमतरता?
Published on

गर्भावस्थेत अनेक स्त्रियांना लोहाची (आयर्न) कमतरता जाणवते, याचं मुख्य कारण शरीर स्वतःच लोह शोषण रोखतं असतं. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट मोनिका अण्णा यांनी हे स्पष्ट करताना सांगितलं की, गर्भधारणेनंतर लोहाची पातळी वाढवणं जवळपास अशक्य असतं. त्यामुळेच गर्भधारणेपूर्वीच लोहसाठा (फेरिटिन) चांगला असणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

मोनिका अण्णा या आतड्यांच्या आरोग्य, थायरॉईड, स्त्रियांच्या हार्मोनल समस्या, गर्भधारणेपूर्वीची काळजी आणि फर्टिलिटी सपोर्ट या क्षेत्रात तज्ज्ञ आहेत. अलीकडेच त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत सांगितले, "माझ्या बहुतांश महिला क्लायंट्सना लोहाची कमतरता आढळते आणि गर्भावस्थेत ती अधिक स्पष्ट होते. लोह कमी असणं हे प्रसूतीनंतरच्या थकव्याचं (पोस्टनेटल डिप्लिशन) सर्वात मोठं कारण असतं."

गर्भावस्थेत शरीर का रोखतं लोह शोषण?

मोनिका यांच्या मते, गर्भावस्थेच्या जवळपास निम्म्या कालावधीत शरीर स्वाभाविकपणे लोह शोषण कमी करतं. याला कारणीभूत आहे ‘हेप्सिडिन’ नावाचं हार्मोन. "बाळाची लोहाची गरज सुरुवातीला फारच कमी असते, तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करण्यासाठी हेप्सिडिन लोह शोषण कमी ठेवतं. म्हणून कितीही चांगलं खाल्लं किंवा सप्लिमेंट्स घेतली तरी फारच थोडं लोह शरीरात शोषलं जातं," असं त्या स्पष्ट करतात.

२४ आठवड्यांनंतरही आईला मिळत नाही पुरेसं लोह

गर्भावस्थेच्या २४ आठवड्यांनंतर हेप्सिडिनची पातळी खालावते आणि लोह शोषण वाढतं. पण यातही मोठी अडचण आहे. मोनिका म्हणतात, "त्या वेळी शोषलं जाणारं जवळपास सगळंच लोह थेट नाळेद्वारे बाळाकडे जातं; आईला त्याचा फारसा फायदा होत नाही."

गर्भधारणेपूर्वीच लोहसाठा का महत्त्वाचा?

जर गर्भधारणेच्या सुरुवातीला फेरिटिनची (लोहसाठा) पातळी कमी असेल, तर ९ महिन्यांत कमतरता आणखी गंभीर होते. यामुळेच प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांना प्रचंड थकवा, केस गळणं, चक्कर येणं असे त्रास होतात.

मोनिका यांचं ठाम मत आहे. "गर्भधारणेपूर्वी लोह आणि इतर महत्त्वाच्या पोषकतत्त्वांचा साठा उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे गर्भावस्थेतील गुंतागुंत कमी होतात, ऊर्जा टिकते आणि प्रसूतीनंतरची रिकव्हरी उत्तम होते."

गर्भधारणा नियोजन करत असाल तर आता डॉक्टर किंवा पोषणतज्ज्ञांकडून लोहाची पातळी तपासून घेणं आणि गरज पडल्यास सप्लिमेंटेशन सुरू करणं हेच सर्वात प्रभावी पाऊल ठरेल.

(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)

logo
marathi.freepressjournal.in