लहानपणापासून एक गोष्ट सतत आपल्या कानावर पडते, “संध्याकाळी झोपू नये!” घरातील मोठी माणसं हे आपल्याला नेहमीच सांगतात. पण का? यामागचं कारण तुम्ही कधी विचारलंय का?
आयुर्वेदाचार्य डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओत याचं स्पष्ट उत्तर दिलं आहे. त्यांच्या मते, तिन्ही सांजेला म्हणजेच सूर्यास्तानंतरच्या वेळेत झोपणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.
यामागचं कारण सांगताना त्या म्हणाल्या, "या वेळी आपला ‘अग्नी’ आधीच मंदावलेला असतो, म्हणजेच पचनशक्ती कमी असते. अशा वेळी झोपलो तर पचनक्रिया आणखी मंदावते आणि मग पुढच्या जेवणाची भूक लागत नाही. यामुळे अपचन, जडपणा, अॅसिडिटी यांसारखे त्रास सुरू होऊ शकतात."
"दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे झोपेचे चक्र बिघडते. संध्याकाळी गाढ झोप घेतली, तर रात्री झोपच लागत नाही किंवा उशिरा झोप येते. परिणामी, पुढच्या दिवशी थकवा, डोकेदुखी, मूड खराब होणं यांसारखे त्रास जाणवू शकतात." असंही त्या म्हणाल्या.
मग उपाय काय?
थकल्यासारखं वाटलं तरी संध्याकाळी फक्त थोडा आराम करा, झोपू नका.
चालणं, हलकं स्ट्रेचिंग, संगीत ऐकणं किंवा आवडीचं काहीतरी करणं या गोष्टींनी थकवा कमी करता येईल.
रात्रीची झोप वेळेवर आणि गाढ लागेल याची काळजी घ्या.
डॉ. मानसी यांच्या सांगण्याप्रमाणे, संध्याकाळची ही छोटी सवय बदलली, तर पचनक्रिया सुधारेल आणि झोपेचा दर्जाही वाढेल.
(Disclaimer: ही माहिती डॉ. मानसी मेहेंदळे धामणकर यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओवर आधारित आहे. यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. या माहितीची 'नवशक्ति' पुष्टी करत नाही.)