हिवाळा आला की त्वचेचा कोरडेपणा, ओठांचा रापलेला पोत आणि चेहऱ्याची निस्तेज चमक ही समस्या कायमच भेडसावते. अशा वेळी एक साधीशी पण प्रभावी गोष्ट मदतीला धावून येते ती म्हणजे 'पेट्रोलियम जेली!' बर्याच जणींच्या ड्रेसिंग टेबलवर कायम दिसणारी ही छोटीशी जार फक्त त्वचा मऊ ठेवण्यासाठीच नाही, तर तिचे अनेक भन्नाट उपयोग आहेत.
त्वचेला स्निग्धता आणि तरुणपणा
पेट्रोलियम जेली त्वचेतील ओलावा टिकवून ठेवते. त्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि अकाली सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक टवटवीत दिसते.
लिप बाम म्हणून उत्तम पर्याय
हिवाळ्यात ओठ कोरडे होणे ही सर्वात सामान्य समस्या. अशावेळी महागडे लिप बाम न वापरता थोडीशी पेट्रोलियम जेली ओठांवर लावल्यास त्यांना हायड्रेशन मिळते आणि नरमपणा टिकून राहतो.
नैसर्गिक ग्लो साठी
चेहऱ्यावर निस्तेजपणा दिसत असेल, तर मेकअपच्या आधी किंवा नंतर हलकीशी जेली वापरल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. ती त्वचेला एक सुंदर डेवी फिनिश देते.
मेकअप आणि कलर स्टेन रिमूव्हर
मेकअप काढताना मेकअप रिमूव्हर नसेल तर पेट्रोलियम जेली एक उत्तम पर्याय ठरतो.
तसेच केस रंगवताना हेअरलाइनवर जेली लावल्यास रंग त्वचेला चिकटत नाही.
परफ्यूम टिकवण्यासाठी गुपित
परफ्यूम मारण्यापूर्वी त्या ठिकाणी थोडीशी पेट्रोलियम जेली लावल्यास सुगंध जास्त काळ टिकतो. हा ट्रिक तुम्ही पुढच्या पार्टीत नक्की वापरून बघा!
आफ्टर शेव्ह लोशन
शेविंगनंतर त्वचा कोरडी आणि संवेदनशील होते. अशा वेळी पेट्रोलियम जेलीचा हलका थर लावल्यास त्वचेला आराम मिळतो आणि इरिटेशन कमी होते.
एक छोटीशी टिप
जेलीचा वापर नेहमी स्वच्छ हातांनी करा आणि जास्त प्रमाणात न वापरता फक्त आवश्यक तेवढाच वापरा.
हिवाळ्याचा कोरडेपणा दूर करून त्वचेला नरम, चमकदार आणि तजेलदार ठेवण्यासाठी ही पेट्रोलियम जेली तुमची सर्वात विश्वासू ब्यूटी साथीदार ठरू शकते!