हिवाळ्याची चाहूल लागताच खोकला, सर्दी आणि घसा दुखणे यांसारख्या तक्रारींमध्ये झपाट्याने वाढ होऊ लागते. तापमानातील सतत बदल, थंड-कोरडी हवा आणि वाढलेले प्रदूषण यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दम्याच्या रुग्णांवर याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक व घरगुती उपचार अधिक फायदेशीर ठरतात.
तुळशीची पानं
आयुर्वेदात ‘औषधांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीमध्ये श्वसनमार्ग स्वच्छ ठेवणारे घटक मुबलक प्रमाणात असतात. सकाळी रिकाम्या पोटी पाच ताजी तुळशीची पाने चावून खाल्ल्यास सर्दी, खोकला आणि श्वसनाच्या किरकोळ तक्रारींपासून शरीराची नैसर्गिक संरक्षणशक्ती वाढते. काही संशोधनांनुसार, तुळशीतील नैसर्गिक संयुगे विषाणूंची वाढ रोखण्यास मदत करतात. आले–मिरीसोबतचा तुळशी काढा उकळून घेतल्यास त्याची परिणामकारकता अधिक वाढते, असे वैद्य सांगतात.
हळदीचे दूध
हळदीतील करक्यूमिन हा दाहक-विरोधी घटक खोकला आणि घशातील सूज कमी करण्यास मदत करतो. हिवाळ्यात अनेकजण झोपण्यापूर्वी कोमट हळदीचे दूध पिणे पसंत करतात. यामुळे शरीराला उब मिळते, कफ सैल होऊन बाहेर येण्यास मदत होतो आणि घशातील त्रास शांत होतो. एका ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी मिसळावी. दूध किंचित थंड झाल्यावर एक चमचा मध टाकल्यास चव आणि पोषकता दोन्ही वाढतात.
आले–मध
घसा खवखवणे आणि सुरुवातीच्या खोकल्यासाठी आले आणि मध हे सर्वात सोपे पण प्रभावी संयोजन मानले जाते. आल्यातील जिंजेरॉल घशातील जळजळ कमी करतो, तर मधातील प्रतिजैविक गुणधर्म त्रास आटोक्यात ठेवतात. एक चमचा ताजे किसलेले आले आणि समान प्रमाणात मध मिसळून त्वरित सेवन करणे फायदेशीर ठरते.
ओव्याची वाफ
थंडीच्या काळात ओव्याची वाफ घेणे हा अनेक घरांमध्ये पिढ्यान् पिढ्या चालत आलेला उपाय आहे. ओव्याला गरम केल्यावर त्यातून बाहेर पडणारा थायमॉल हा घटक सायनस स्वच्छ ठेवतो आणि श्वसनमार्गातील संक्रमण कमी करण्यास मदत करतो. तज्ज्ञांच्या मते, केवळ आजाराच्या वेळीच नव्हे तर आठवड्यातून एकदा ओव्याची वाफ घेतल्यास श्वसनमार्गातील पडदे मजबूत होतात आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
आवळा
आवळ्यातील भरपूर व्हिटॅमिन सी प्रतिकारशक्ती वाढवते आणि कफ, शिंक व जळजळ या त्रासांवर आराम देते. रस, पावडर, वाळलेला आवळा किंवा मुरंबा – कोणत्याही प्रकारात आवळ्याचे सेवन थंडीत शरीराला अतिरिक्त संरक्षण देऊ शकते. अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे आवळा संसर्गातून बरे होण्याची प्रक्रिया देखील वेगवान करतो.