गोसेवा आयोगासाठी १६ पदे; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती

पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात प्रथमच महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली.
गोसेवा आयोगासाठी १६ पदे; पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची माहिती
Published on

प्रतिनिधी/मुंबई : राज्यात स्थापन झालेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा कारभार गतिमान करण्यासाठी सरकारच्या स्तरावर आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीच आयोगाला आवश्यक असलेल्या एकूण १६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. या मनुष्यबळाच्या परिपूर्ततेनंतर लवकरच आयोगाचे प्रशासकीय कामकाज गतिमान पद्धतीने पूर्ण होईल, असा विश्वास पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी गुरुवारी येथे व्यक्त केला.

पशुधनाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यात प्रथमच महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. या आयोगाची कार्यपद्धती निश्चित करून गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता आयोगासाठी एकूण १६ पैकी ८ नियमित पदे आणि ८ पदे बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त करण्यासाठी तब्बल १ कोटी २७ लाख ५८ हजार इतक्या खर्चास देखील मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र गोसेवा आयोगासाठी पशुसंवर्धन उपायुक्त, स्वीय सहाय्यक, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी (गट ब), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ लिपिक असे प्रत्येकी एक आणि दोन पशुधन विकास अधिकारी (गट अ) असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत, तर बाह्यस्त्रोताद्वारे एक कनिष्ठ लिपिक, एक स्वच्छक, दोन डेटा एंट्री ऑपरेटर, दोन परिचर, दोन सुरक्षारक्षक अशा एकूण ८ जणांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्र गोसेवा आयोग अतिशय गतिमान पद्धतीने काम करेल, असा विश्वास विखे-पाटील यांनी व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in