पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात शनिवारी मध्यरात्री झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील आरोपीचे वडील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यासह सात जणांना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी वाढता जनक्षोभ लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
अटक केलेल्यांमध्ये चालक चत्रभूज डोळस, राकेश पौडवाल, अल्पवयीन मुलाला मद्य देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटरवरील जयेश बोनकर यांचा समावेश आहे. आरोपींना बुधवारी न्यायालयात हजार करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे, नमन भुतडा, जयेश बोनकर व विशाल अगरवाल यांच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नमन प्रल्हाद भुतडा (वय २५), सचिन काटकर (३५), संदीप सांगळे (३५) यांना न्यायालयात हजर केले. यावेळी सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांच्या न्यायालयाने आरोपींना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
न्यायालयाने सुनावले
कल्याणीनगर अपघात हा गंभीर गुन्हा आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला. मुळात हे प्रकरण गंभीर आहे. अपघातात दोघांचे बळी गेले आहेत. पब, हॉटेलमध्ये मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या गोंधळाच्या तक्रारी आल्या आहेत. मद्य पिऊन भरधाव वेगाने वाहन चालविल्याने निष्पांपाचे बळी गेले, अशा शब्दांत अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी सुनावले.
छ. संभाजीनगरमधून विशाल अग्रवालला अटक
विशाल अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योगसमूहाचे प्रमुख आहेत. अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम ३, ५ आणि १९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे माहीत असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दलही त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल हे ‘नॉट रिचेबल’ होते. अखेर त्यांना पुणे पोलिसांनी संभाजीनगरमधील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यांना मंगळवारी संध्याकाळी पोलीस आयुक्तालयात आणून तांत्रिकदृष्ट्या अटक करण्यात आली. बुधवारी अग्रवाल यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला व राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, असे आदेश दिले.
दोन हॉटेलना टाळे
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एक्साईज विभागाने कारवाई करत हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅकला टाळे ठोकले आहे.
बाल न्याय मंडळाचा निकाल धक्कादायक - फडणवीस
‘हिट अँड रन’ प्रकरणावरून पुणे पोलिसांवर जोरदार टीका होत असतानाच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र पुणे पोलिसांची पाठराखण केली आहे. पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक आणि आश्चर्यकारक होता, असे वक्तव्य त्यांनी केले. दरम्यान, याप्रकरणी कोणालाही सोडले जाणार नाही, पोलीस पुन्हा वरच्या कोर्टात जातील, असे फडणवीस म्हणाले.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी थेट पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आणि त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. फडणवीस म्हणाले की, पोलिसांनी सर्व घटनेचे पुरावे बाल न्याय मंडळाला दिले. पण तरीही बाल न्याय मंडळाने दिलेला निकाल हा पोलिसांसाठी धक्कादायक होता. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी जो रिमांडचा अर्ज दाखल केला होता, त्यात अतिशय स्पष्टपणे कलम ३०४ नमूद करण्यात आले आहे. स्पष्टपणे लिहिले की, हा जो मुलगा आहे तो १७ वर्षे ८ महिन्यांचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर कायद्यामध्ये ज्या सुधारणा (अमेंडमेंट) झाल्या, त्यामध्ये १६ वर्षांवरील जी मुले असतील त्यांना गंभीर गुन्ह्यामध्ये (‘हेनियस क्राईम’) प्रौढ (अॅडल्ट) म्हणून वागवले (ट्रीट केले) जाऊ शकते. रिमांड अॅप्लिकेशनही माझ्याकडे आहे. त्यामध्ये “कलम ३०४ ए नाही तर हा कलम ३०४ च पोलिसांनी नमूद केले होते. दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि पोलिसांचा आरोपीला ‘अॅडल्ट ट्रीट’ म्हणून करण्याचा अर्ज बाजूला ठेवला. रिमांडच्या अर्जावर त्यांनी सौम्य दृष्टी (लिनियल्ट व्ह्यू) घेत १५ दिवस सोशल सर्व्हिस करा, डिअॅडिक्शन करा, अशाप्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरे म्हणजे हा पोलिसांकरिता एक धक्का होता. कारण पोलिसांनी सर्व पुरावे दिले आहेत”, असे फडणवीस म्हणाले.