वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या लेकीवर काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगात असलेली एक कार खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या कोरड्या नदीपात्रात कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नालासोपारा आणि मीरा-भाईंदर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.
(फोटो सौ. 'X')
(फोटो सौ. 'X')
Published on

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज सकाळी हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगात असलेली एक कार खेड तालुक्यातील जगबुडी नदीच्या कोरड्या नदीपात्रात कोसळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नालासोपारा आणि मीरा-भाईंदर परिसरातील नागरिकांचा समावेश आहे.

मीरा भाईंदर येथील रहिवासी विवेक मोरे, त्यांच्या पत्नी मिताली मोरे (४५ वर्ष) आणि त्यांचा मुलगा निहार मोरे (१९ वर्ष), तसेच नालासोपारा येथील सौरभ परमेश पराडकर (२२ वर्षे), मेधा परमेश पराडकर आणि मोरे यांचा भाचा श्रेयस राजेंद्र सावंत (२३ वर्षे) हे किया कार (MH 02 3265) मधून प्रवास करत होते. हे सर्वजण मिताली मोरे यांच्या माहेरी देवरुख येथे त्यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते.

पहाटे ५.४५ च्या सुमारास जगबुडी नदीच्या पुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाच्या मधून थेट सुमारे १०० ते १५० फूट खोल कोरड्या नदीपात्रात कोसळली. नदीपात्र कोरडे असल्याने कार थेट दगडांवर आदळली आणि अक्षरशः चेंदामेंदा झाली. अपघात इतका भीषण होता की पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

यामध्ये वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या मिताली मोरे यांच्यासह त्यांचा मुलगा निहार, तसेच सौरभ पराडकर, मेधा पराडकर आणि श्रेयस सावंत यांचा जागीच मृत्यू झाला. तर विवेक मोरे आणि चालक गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि आपत्कालीन बचाव पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. क्रेनच्या मदतीने कार नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली असून अपघाताबाबत पुढील तपास सुरू आहे.

अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या या प्रवाशांवरच अंत्यसंस्काराची वेळ येईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या दुर्घटनेमुळे नालासोपारा आणि मीरा-भाईंदर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in