

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या या निवडणुकीदरम्यान स्थानिक पातळीवर नव्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुतीच्या गोटात अंतर्गत तणाव निर्माण झाल्याचे चित्र आता दिसत आहे. अंतर्गत नाराजीमुळे शिंदे गटातील मंत्र्यांनी मंगळवारी (दि. १८) राज्य मंत्रिमंडळ बैठकीवर अघोषित बहिष्कार टाकल्याचे समजते. या घडामोडींनंतर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. तसेच, आदित्य यांनी एकनाथ शिंदेंना "आज परत कोणीतरी गावी जाणार…" असा खोचक टोलाही लगावला आहे.
शिंदे सोडून इतरांचा बहिष्कार
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी झालेल्या शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र मुख्य बैठकीला एकनाथ शिंदे सोडून इतर शिंदे गटाच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली. त्यामुळे शिंदे गटात गंभीर नाराजी असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. मंत्रिमंडळाच्या बैठकीला उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक हे प्रमुख नेते गैरहजर होते.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
यावर आता आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट करत म्हटले, "असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!"
पुढे त्यांनी म्हटलं, "पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रीमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवे फुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार?! महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे. चला, आज परत कोणीतरी गावी जाणार…" असा टोला लगावत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
नाराजीनाट्य अन् शिंदे
याआधीही असे नाराजीनाट्य समोर आल्यावर एकनाथ शिंदे वारंवार त्यांच्या साताऱ्यातील दरेगावी गेल्याचे वृत्त आले आहे. यावर दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी "स्ट्रेस वाढतो म्हणून एकनाथ शिंदे गावी जातात" असा टोलाही लगावला होता.
शिंदे गटाच्या नाराजीचे कारण
भाजपकडून शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना डावलले जात असल्याचे समजते. तसेच कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते फोडल्याचे म्हटले जात आहे. यामुळे महायुतीला तडा जाणार का? किंवा त्याचे पडसाद आगामी निवडणुकीत उमटणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.