जव्हार : जव्हार उपविभागातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड व कासा पोलीस स्थानक हद्दीत सण-उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेल लक्ष ठेवून असल्याचे जव्हार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी - गणपतराव पिंगळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे कोणत्याही - नागरिकांनी समाज माध्यमांवर चुकीच्या पोस्ट करू नये, असे आवाहन पालघर पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आणि ईद- ए-मिलाद हे दोन्ही सण यावर्षी एकाच कालावधीत आले आहेत. जव्हार उपविभागात हे दोन्ही सण साजरे करताना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द व शांततेला गालबोट लागणार नाही याची काळजी घेऊन एकोप्याने व आनंदाने सण साजरे करावेत, जेणेकरून सामजिक सलोखा अबाधित राहील. उत्सवांचे या काळात सर्व धर्मीयांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, देखावे, वेगवेगळ्या प्रतिकृती, वेगवेगळ्या सणांच्या मिरवणुका सुरू आहेत. त्या संदर्भातील माहिती प्रसिद्ध करताना काळजी घ्यावी. सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करावा.
पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन
जव्हार उपविभागातील पोलीस स्थानक हद्दीतील शहर व गावांना सर्वधर्मीयांच्या सामंजस्याचा चांगला इतिहास आहे. त्यामुळे कोणतीही चुकीची पोस्ट समाज माध्यमांवर आल्यावर त्याबाबत जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती देण्याचे आवाहन पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
- गणपतराव पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार